धुळे मनपा निवडणूक ; छाननी प्रक्रियेत तब्बल तीन उमेदवारांचे अर्ज बाद

0

समाजवादी पक्षाच्या फातमा अन्सारींची बिनविरोध निवड

धुळे- धुळे महापालिका निवडणूकीसाठी गुरुवारी उमेदवारी अर्ज छाननीची प्रक्रिया पार पडली. यात प्रभाग क्रमांक 12 अ मधील तब्बल चार उमेदवारांपैकी तिघांचे उमेदवारी अर्ज तांत्रिक कारणावरुन बाद झाल्याने समाजवादी पार्टीच्या उमेदवार अन्सारी फातमा नुरुल अमीन यांना लॉटरीच लागली. तिघांचे उमेदवारी अर्ज बाद झाल्यामुळे फातमा अमीन अन्सारी यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. या निवडीनंतर समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. महापालिका निवडणूक प्रक्रियेतील ही अनोखी घटना गुरुवारी घडली. शहरातील प्रभाग क्रमांक 12 अ मधून केवळ चार उमेदवारी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यात राष्ट्रीय समाज पक्षातर्फे पठाण जुबेदाबी अफजलखान यांनी अर्ज दाखल केला होता. अपक्ष म्हणून शेख नसीम शेख करिम यांनी अर्ज दाखल केला होता. अन्सारी फौजियाबानो यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे अर्ज दाखल केला होता. अन्सारी फातमा नुरुलअमीन यांनी समाजवादी पक्षातर्फे अर्ज दाखल केला होता. गुरुवारी महापालिका निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया सुरू झाली. प्रभाग 12 अ मधील उमेदवारांच्या अर्जांची छाननी शाळा क्र.5 येथे सुरू झाली. नागरीकांचा मागस प्रवर्ग महिला राखीव असलेल्या या प्रभागातून चार अर्ज दाखल झाले होते. छाननीत चौघांपैकी तिघांचे अर्ज तांत्रिक कारणांवरुन बाद झाल्याने समाजवादी पार्टीच्या फातमा अमीन यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिला. त्यामुळे त्यांची या प्रभागातून बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. अचानक झालेल्या या विजयामुळे समाजवादी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी प्रभाग कार्यालयाबाहेर जल्लोष केला. महापालिकेच्या 74 पैकी एका जागेवर समाजवादी पार्टीने खाते उघडल्याचा आनंद साजरा केला.