निवडणूक अधिकारी सुधाकर देशमुख यांनी शहरातील राजकीय प्रतिनिधींची घेतली बैठक
धुळे- महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवारी करणार्या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना अडचणीत आणणारा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे. उमेदवारांवरील दाखल गुन्ह्यांच्या तपशिलाचे बॅनर्स मुख्य चौकांसह मतदान केंद्रांबाहेर झळकविले जणार असल्याची महिती आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दिली. महापालिका निवडणूकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर निवडणूकीबाबतच्या विविध बाबींची माहिती देण्यासाठी निवडणूक अधिकारी तथा आयुक्त सुधाकर देशमुख यांनी शहरातील राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींची बैठक घेतली.
यांची बैठकीला उपस्थिती
यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश मोरे, भारिप बहुजन महासंघाचे जिल्हध्यक्ष सिध्दार्थ पारेराव, नगरसेवक फिरोज शेख, समाजवादी पार्टीचे जमिल मन्सुरी अकिल अहमद, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस गिरीश भामरे, शहर सदस्य दिलीप पाटील, बहुजन समाजपार्टीचे अनिल दामोदर, भाजपाचे तेजस गोटे, योगेश मुकुंदे, चेतन मंडोरे, माजी महापौर जयश्री अहिरराव, शिवसेनेचे महानगरप्रमुख संजय गुजराथी, राजेंद्र पाटील हे उपस्थित होते. महापालिका निवडणूकीत ऑनलाईन नामनिर्देशन पत्र भरताना घाव्या लागणार्या शपथपत्राचा सुधारित नमुना राज्य निवडणूक आयोगाने 13 ऑगस्टला प्रसिध्द केला असून त्याबाबत बैठकीत सविस्तर माहिती देण्यात आाली. निवडणूक रिंगणात असलेल्या ज्या उमेदवारांवर विविध कलमांखाली गुन्हे दाखल आहेत. त्या सर्व गुन्ह्यांच्या तपशिलाचे बॅनर्स महापालिकेकडून मुख्य चौकांसह त्या उमेदवारांच्या प्रभागातील मतदान केंद्रासमोर लावले जातील असे आयुक्तांनी स्पष्ट केले. शपथपत्रात उमेदवाराला स्वतःच्या व त्याच्यावर अवलंबून असणार्यांच्या उत्पन्नाचे स्त्रोत व त्याबाबतचे मागील तीन वर्षाचे तपशील सादर करावे लागणार आहेत. त्यात शेती, नोकरी, व्यापार,व्यवसाय, भांडवली नफा, बक्षिसे देणग्या याबाबतचा सविस्तर तपशील सादर करावा लागेल. मतदान केंद्रात उमदेवाराला केवळ तीन मतदारांचे मतदान होईल,एवढाच वेळ थांबता येईल, असेही राजकीय पक्ष प्रतिनिधींच्या या बैठकीत स्पष्ट करण्यात आले आहे.