धुळे- टेलिव्हिजन किंवा रेडिओवर जाहिराती देण्यापूर्वी राजकीय पक्षांना प्रसारण प्रमाणपत्र घेण्याचे बंधन राज्य निवडणूक आयोगाने घातले आहे. त्यासाठी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाने निवडणूकांमधील जाहिरात प्रसारणासाठी प्रमाणपत्र देण्याचे अधिकार राज्य निवडणूक आयोगास असतील, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे राजकीय पक्ष अथवा उमेदवारांनी सादर केलेल्या जाहिरातीची ध्वनिफित, चित्रफित, सीडी या साहित्याची तपासणी करुन त्यांना त्याबाबतचे प्रमाणपत्र विहित मुदतीत देणे आवश्यक आहे. मनपा निवडणुकीसाठी जाहिरात प्रसारण प्रमाणपत्र देण्याचे अधिकारी निवडणूक अधिकारी तथा आयुक्त सुधाकर देशमुख यांना देण्यात आले आहे. नगरपरीषद, नगरपंचायत, जिल्हा परीषद किंवा पंचायत समितीसाठी हे अधिकार जिल्हाधिकार्यांना असतील. समितीकडून राजकीय पक्ष किंवा उमेदवारांचे टिव्ही किंवा रेडिओवरील जाहिरातीसाठी आलेले अर्ज व साहित्य तपासून प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही केली जाणार आहे.