धुळे- महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी 6 निवडणूक निर्णय अधिकारी व 18 सहायक निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. तर एक अतिरिक्त पथकही नियुक्त करण्यात आले आहे. दरम्यान महापालिका प्रशासनाने तीन सहायक निवडणूक निर्णय अधिकारी बदलले आहेत. याआधीच्या अधिकार्यांच्या नियुक्तीवर भाजपचे आमदार अनिल गोटे यांनी आक्षेप घेतला होता. तसेच यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आणि तरीही कार्यवाही झाली नाहीतर आपण यासंदर्भात न्यायालयात दाद मागणार, असा इशारा आमदार गोटे यांनी एका प्रसिध्दी पात्रकातून दिला होता. महापालिका निवडणूकीसाठी नेमण्यात आलेल्या सहायक निवडणूक निर्णय अधिकार्यांपैकी डी.बी.अहिरे, प्रभाग क्रमांक 8,9,10 व 11 यांच्याऐवजी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार अनिल गावीत, प्रल्हाद सोनवणे प्रभाग क्रमांक 14,17 व 18 यांच्या ऐवजी धुळे येथील अपर तहसिलदार अमोल मोरे व सी.के.वाणी प्रभाग क्रमांक 12,13 व 19 यांच्याऐवजी धुळे येथील उपनिबंधक कार्यालयातील उपनिबंधक किशोर रत्नाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
अधिकारी बदलल्याने खळबळ
निवडणूकीच्या रणधुमाळीला सुरुवात झालेली असतांनाच अचानक तीन अधिकारी बदलण्यात आल्याने ती चर्चेचा विषय ठरला आहे. आमदार अनिल गोटे यांनी यापूर्वीच निवडणूकीसाठी नेमण्यात आलेल्या अधिकार्यांबाबात प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. प्रशासकीय कारणास्तव हे फेरबदल करण्याचे आयुक्तांनी काढलेल्या आदेशात नमुद करण्यात आल्याची माहिती मनपा सुत्रांनी दिली आहे.