आमदार अनिल गोटे यांची घोषणा ; पत्नी हेमा गोटे महापौर पदाच्या उमेदवार
धुळे- धुळे महापालिका निवडणूक स्वाभिमानी भाजप व लोकसंग्राम पक्षांतर्गत लढवणार असून भाजपा जिल्हाध्यक्षांनी दिलेल्या लिस्टमध्ये 28 गुन्हेगारी प्रवृत्तीचे उमेदवार असल्याने ही बाब आपल्याला मान्य नाही, असे सांगत आमदार अनिल गोटे यांनी महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले. शहरातील कल्याण भवनातील पत्रकार भवनात मंगळवारी दुपारी त्यांनी पत्रकार परीषद घेतली. भाजपा विरूद्ध आमदार गोटे असा संघर्ष उभा राहिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी धुळ्यातील निवडणूक गोटे यांच्या नेतृत्वात लढण्यात येईल, असे सांगितले होते तर त्यांना राजीनामा मागे घेण्याचा निर्धार केला होता शिवाय पक्षाने काही दगाफटका केल्यास त्याचे परीणाम पक्षाला गंभीररीत्या भोगावे लागतील, असा सूचक इशाराही दिला होता.
सर्व 74 जागांवर उमेदवार देणार
आमदार गोटे म्हणाले की, महापालिका निवडणूक माझ्या नेतृत्वात लढवण्याचा मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला होता मात्र मला कुणाचाही फोन आलेला नाही, आज दुपारी 12 वाजता भाजपाचे जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल आले व त्यांनी भाजपा उमेदवारांची लिस्ट दिली होती मात्र त्यात 28 उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याने त्यांनी आपण ही बाब स्पष्टपणे मान्य नसल्याचे सांगितले व अग्रवाल यांनी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याशी संवाद साधण्याचे आपल्याला कळवले मात्र आपल्याशी कुणीही संपर्क केला नसल्याचे गोटे म्हणाले. महापौर पदासाठी आता पत्नी हेमा गोटे यांना उमेदवारी देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.