धुळे- महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी दोन नगरसेवकांनी पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे 70 पैकी 17 नगरसेवकांनी पदाचा राजीनामा दिला. त्याबाबतची माहिती प्रशासनाने राज्य निवडणूक आयोगाला सादर केली आहे. मनपा निवडणुकीत तिकीट मिळविण्यासाठी विद्यमान नगरसेवक धावपळ करीत होते. एका पक्षाने तिकीट नाकारल्यानंतर दुसर्या पक्षाकडून तिकीट मिळविण्याचा त्यांचा प्रयत्न होता. पंरतु 1986 च्या पक्षांतर कायद्यानुसार एका पक्षाचा नगरसेवक असतांना दुसर्या पक्षाकडून निवडून आल्यास व पहिल्या पक्षाने त्यावर हरकत घेतल्यास उमेदवारावर अपात्रतेची कारवाई होऊ शकते. त्यामुळे आधीच्या पक्षााच्या नगरसेवक पदाचे राजीनामे देण्याचे सत्र सुरु झाले होते.
अखेरच्या दिवशी दोघांचे राजीनामे
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी प्रभाग 7 अ मधील राष्ट्रवादीचे नगरसेवक रमेश महादू बोरसे व प्रभाग 4 ब मधील राष्ट्रवादीच्या नगरसेविका कल्पना बोरसे यांनी पदाचा राजीनामा दिला. सर्वाधिक राजीनामे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी दिले आहेत तर शिवसेना व समाजवादी पार्टीच्या नगरसेवकांनी देखील पदाचे राजीनामे यापूर्वी दिले आहेत. यापैकी बहुतांश नगरसेवक हे पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. ते आता भाजपतर्फे उमेदवारी करीत आहेत. त्यांच्या लढतीकउे सर्वांचे लक्ष लागून आहे. कारण त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी पक्षातर्फे त्याच तुल्यबळाचा उमेदवार उभा करण्याचा प्रयत्न केला आहे. आता या लढती सवर्वांच्या लक्ष वेधून घेणार्या ठरणार आहे.
राजीनामे दिलेले नगरसेवक असे
चंद्रकांत सोनार, फारुख शाह, सोनल शिंदे, अमोल मासुळे, जुलाहा रश्मीबानो अकील अहमद, सुनिल सोनार, कशीश उदासी, संजय जाधव, शकुंतला जाधव, चंद्रकला जाधव, विश्वानाथ खरात, जुलाहा नरुन्नीसा मकबुल अली. हलीम बानो मोहमद शाबान अन्सारी, मायादेवी परदेशी, सैय्यद साबीर अली मोतेबर, कल्पना बोरसे, रमेश बोरसे आदींचा समावेश आहे.