12 दिवसाआड होणार्या पाण्यामुळे नगरसेवक आक्रमक
धुळे ः महानगर पालिकेच्या बजेटवरील सभेत गुरुवारी अक्षरश: पाणी पेटले. पाण्याचा भडका उडाला. ऐन पावसाळ्यात गेल्या 12 दिवसांपासून धुळेकर पाण्यापासून वंचित असल्याने नगरसेवकांनी आक्रमक होत आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. पावसाळ्यात पाणी मिळत नसल्याने सोशल मीडियामध्ये आमची बदनामी होते, आम्ही लोकांना तोंड कसे दाखवायचे? असा सवाल मनपातील सभागृह नेते अमोल ऊर्फ बंटी मासुळे यांच्यासह बहुसंख्य नगरसेवकांनी केला.
पाणीप्रश्नावरून गाजली सभा
महापालिकेच्या अंदाजपत्रकावर चर्चेसाठी आज सकाळी 11 वाजता महापालिकेच्या सभागृहात महासभेचे आयोजन करण्यात आले होते. या महासभेत शिवसेनेचे नगरसेवक संजय गुजराथी यांनी सांगितले की, महापालिका हद्दीत 11 गावांचा समावेश करण्यात आला आहे. या 11 गावांसाठी महापालिकेने अवघ्या 50 लाखांची तरतूद केली आहे. लोकसंख्येचा विचार केला तर सरासरी 100 रुपये माणसी खर्च महापालिका करणार आहे. हे अत्यंत अन्यायकारक आहे. एकट्या वरखेडी ग्राम पंचायतीकडून 30 ते 35 लाख रुपये मनपाला भेटतात. त्याहीपेक्षा अधिकची रक्कम वलवाडी ग्राम पंचायतीकडून मिळते. असे असताना महापालिका या 11 गावांच्या मुलभूत सोयीसुविधांसाठी निधीच्या तरतुदीमध्ये कंजुषी का करीत आहेत. मुलभूत सुविधा देणे हे महापालिकेचे कर्तव्य असताना सध्याच्या या गावांची अवस्था बेवारश्यासारखी झाली आहे. धुळ्यात पाणीटंचाई निर्माण झाली असून, या पाणीटंचाई मागचे कारण तापी पाणीपुरवठा योजनेकडे बोट दाखविले जाते. गाळयुक्त पाणी आल्यामुळे फिल्टर यंत्रणा दर तासाला दुरुस्त करावी लागेल. त्याचबरोबर पाणी गाळयुक्त दूषित आल्यामुळे नागरिकांच्या रोषालाही सामोरे जावे लागेल. म्हणून तापीचा पाणीपुरवठा थांबविण्यात आल्याचे आयुक्तांनी सांगितल्याचे गुजराथी म्हणाले, आयुक्तांनी वस्तुस्थिती मांडली असली तरी निधीची तरतूद करुन वेगळी यंत्रणा राबवून धुळ्याला पाणीपुरवठा करता येणार नाही का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. कचरा संकलनासाठी आपण 80 घंटागाड्या घेणार असताना 1 कोटी भाड्यापोटी का द्यायचे? असेही ते म्हणाले. बांधकाम परवानगीची ऑनलाईन प्रक्रिया सुरु झालेली नसताना मनपाने मॅन्युअली प्रक्रिया का बंद केली आहे. त्यामुळे महापालिकेचे उत्पन्न बुडते असेही गुजराथी यांनी सभागृहाला निदर्शनात आणून दिले. सभागृहनेते अमोल मासुळे यांनी सांगितले की, चर्चा जरी बजेटवर असली तरी त्यापेक्षाही महत्वाचा प्रश्न पाण्याचा आहे. पावसाळ्यात लोकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर आमची बदनामी होते. लोकांना काय उत्तर द्यावे, असा प्रश्न आम्हाला पडतो. चंद्रपूर महापालिकेच्या धर्तीवर धुळ्यातदेखील तशीच यंत्रणा राबवून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी सोडवावा, अशी मागणी त्यांनी केली. सर्वपक्षीय नगरसेवकांना विकास निधी म्हणून प्रत्येकी 20 लाख रुपये स्थायी समितीच्या सभापती श्रीमती वालीबेन मंडोरे यांनी मंजूर केल्याबद्दल त्यांचे भाजपाच्या नगरसेविका सौ. प्रतिभाताई चौधरी यांनी जाहीर अभिनंदन केले. घनकचरा व्यवस्थापनासाठी देवपूर भागात सहा नव्हे तर 8 ट्रॅक्टर पाठवावेत, अशी मागणीही नगरसेविका सौ. चौधरी यांनी केली. पाण्याच्या प्रश्नावरुन नगरसेविका मायादेवी परदेशीदेखील आक्रमक झाल्या. त्यांनी दूषित पाण्याची बाटलीच आयुक्तांच्या समोर ठेवली. प्रभागात असे पाणी येत असताना जनतेच्या आरोग्याची हमी कोण घेणार? पाणी प्रश्नावरुन आमच्यावर 307 चा गुन्हा दाखल होतो. मात्र, आम्हाला त्याची फिकिर नाही. जनतेच्या प्रश्नासाठी आम्ही भांडतच राहू, कितीही गुन्हे दाखल होवू द्या.