दोंडाईचा येथील नराधमास जाहीर फाशी देण्याची मागणी
धुळे । दोंडाईचा येथील नराधमास केवळ शिक्षाच नव्हे तर जाहीर फाशी देण्यात यावी. सहआरोपींची चौकशी करावी. हा खटला जलदगती न्यायालयात चालवून सरकारी वकील म्हणून अॅड.उज्वल निकम यांची नियुक्ती करावी यासह अन्य मागण्या करीत सर्व समाज समावेशक मुकमोर्चा आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या मोर्चाचे घोषवाक्यच हे होते की, ’ना जातीसाठी, ना धर्मासाठी -एक होवू लेकीसाठी.’ त्यामुळे आजच्या या मुकमोर्चात हजारोंच्या संख्येने विविध समाजातील आणि जाती-धर्मातील लोक रस्त्यांवर उतरले होते.
सकाळी 11 वाजता मनोहर टॉकीज परिसरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. हेमानी गोविंद वाघ, इशा नंदकुमार बेडसे, प्रणाली युवराज चौधरी, शिवानी संजय कोठावदे, सिध्दी विजय करनकाळ, संजना सुनिल बैसाणे, हर्षदा कैलास बोरसे, सायना भुषण चौधरी, साक्षी मनोज मोरे, रोशनी नाना चौधरी, रुपाली चौधरी या 11 युवतींच्या पथकातील पाच युवतींनी या ठिकाणी मनोगत व्यक्त केल्यानंतर मोर्चाला सुरुवात झाली. राजकमल चौक, पाचकंदील, शहर पोलीस चौकी, सराफ बाजार, बॉम्बे लॉज, कराचीवाला खुंट, महापालिका, झााशी राणी पुतळामार्गे हा मोर्चा जुने जिल्हाधिकारी कार्यालय येथे पोहचला. तेथे उभारलेल्या भव्य व्यासपिठावर सहा युवतींनी मनोगत व्यक्त करून दोंडाईचा येथील घटनेचा केवळ निषेधच नोंदविला नाही तर मनात असलेला संतापही व्यक्त केला.