धुळे-धुळे समोरुन येणार्या ट्रकने बसला हुलकावणी दिल्याने दुचाकीवरील दोघे बहिण-भावांचा अपघात झाला. या अपघातात बस बहिणीच्या अंगावरुन गेली. त्यात ती जागीच ठार झाली. आज दुपारी फागणे ता.धुळे येथे ही घटना घडली. या घटनेनंतर संतप्त गावकर्यांनी महामार्ग रोखून धरला. फागणे ता.धुळे येथील सिमा ईश्वर पाटील (वय 20) ही तरुणी तिच्या भावाच्या मोटरसायकलवरुन आज सकाळी 11.30 वाजता धुळ्याकडे येण्यासाठी निघाली होती. धुळे पारोळा रोडवर फागणे गावच्या हद्दीतच बहादरपूर- धुळे ही बस उभी असतांना तिच्या बाजूने सिमाचा भाऊ दुचाकीवरुन मार्ग काढत असतांना समोरुन येणार्या ट्रकने हुलकावणी दिली. त्यामुळे सिमा आणि तिचा भाऊ खाली पडले.द ुर्दैवाने त्याचवेळी थांबलेली बस सिमाच्या अंगावरुन गेल्याने ती जागीच गतप्राण झाली. तर तिचा भाऊ गंभीर जखमी झाला आहे. या अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी महामार्ग रोखून धरले. महामार्ग रोखून धरल्याने या मार्गावरील वाहतुक मोठ्या प्रमाणात ठप्प झाली आहे. दुपारी उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु होती.