धुळे येथे महाविद्यालयीन तरुणाची आत्महत्या

0

धुळे : शहरातील देवपूर येथील  उन्नती कॉलनीच्या उद्यानाच्या मुख्य प्रवेशद्वारालाच एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी पहाटे उघडकीस आली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पश्चिम देवपूर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, प्रेम प्रकरणातून त्याने आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

साक्री तालुक्यातील दहिवेल येथील संकेत सुरेश गवळी (१८) याने जयहिंद संस्थेमध्ये १२ विज्ञानचे शिक्षण पूर्ण केले होते. त्यानंतर पुढील शिक्षणाच्या प्रवेशासाठी तो धुळ्यात आला होता. त्याच्या सोबत त्याचे वडील आणि अन्य होते. प्रवेश प्रक्रियेचे काम आटोपल्यानंतर ते सर्व साक्री तालुक्यातील दहिवेल गावाकडे जाण्यासाठी निघाले होते. बुधवारी रात्री धुळ्यालगत काही खाण्यासाठी ते थांबले सर्वांची नजर चुकवून संकेत तेथून पसार झाला. तो कुठे गेला याची शोधाशोध सुरु झाला.

त्याच्या मित्राशी संपर्क साधण्यात आला. त्यांनतर त्याने देवपुरातील नकाणे रोडवरील शिवप्रताप कॉलनीजवळ उन्नती कॉलनीच्या गार्डनच्या प्रवेशद्वाराला त्याने गळफास घेतल्याची माहिती त्याच्या वडिलांना मिळाली. त्याला वैद्यकीय उपचारासाठी हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. तपासणी करुन त्याला डॉक्टरांनी मयत घोषीत केले. त्यानंतर त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. संकेतचे वडील सुरेश गवळी हे दहिवेल येथे माध्यमिक शिक्षक म्हणून सध्या कार्यरत आहेत. संकेतच्या पश्चात आई, वडील आणि १ बहिण असा परिवार आहे.