धुळे । आपल्या भारत देशाला तरुणांचा देश म्हणून ओळखले जाते. परंतु खरे सर्वेक्षण केले तर हेच तरुण आज गुन्हेगारीच्या दिशेकडे वळलेले दिसतील. एैन तारुण्यात घडलेल्या या प्रकारामुळे अनेकांचे आयुष्य उध्वस्त झाले आहे. ज्या वयात विधायक कामाच्या दिशेने पाऊल पडायला हवे होते, त्या वयात पावले तुरूंगाच्या वाटेवर पडू लागली आहेत. या तरूणांतून सामाजिक जबाबदारीचे भानच हरपत आहे. तरूणाईला रोजगाराची योग्य दिशा मिळत नसल्याने ती गुन्हेगारीच्या विळख्यात अधिकच गुरफटू लागली आहे. काही वर्षांपासून गुन्हेगारी विश्वात तरुणांचा सहभाग वाढत असल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. देशातील अनेक राज्यांसह महाराष्ट्राची भयावह परिस्थिती झालेली आहे. त्यात धुळे शहरातील गुन्हेगारीत तरुणांच्या संख्येने उचांक गाठल्याचे दिसून येते. शहरात गेल्या अकरा महिन्यात सहा निर्घुण खून प्रकरणात 18 ते 35 वयोगटातील युवक तरुणांचा समावेश दिसून येत असून समाजव्यवस्थेला ही बाब धक्कादायक आहे. कुठलाही सारासार विचार न करता थेट दिवसाढवळ्या हत्याराद्वारे खून करण्यापर्यंत मजल गेल्याने येथे नितीमुल्य संस्काराला तिलांजली दिली जात असल्याचे चित्र आहे. पिता पुत्राच्या खुनानंतर तर गुंडगिरीला खतपाणी घालणारे हबकले असून तरुणांच्या वाढत्या सहभागाचे वास्तव पुढे आले आहे.
चोरी, मारामारी, घरफोडी अशा गुन्ह्यांमध्ये सहभागी असणार्या तरुणांचे प्रमाण वाढत असून बलात्कार, खून करण्यापर्यंतच्या गुन्ह्यात तरुणांचा वाढता सहभाग ही धुळे शहरात मोठी समस्या निर्माण झाली आहे. तसेच दिवसेंदिवस ती अधिक गंभीर स्वरूपात वाढत चालली आहे. गेल्या काही महिन्यांपासून होणार्या हत्या प्रकरणामुळे शहरात कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण झाला आहे. सर्वत्र दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे शहर अशाततेचे गर्तेत लोटले गेले आहे. अवैध व्यवसाय व गुंडागर्दी मोडीत काढण्यात पोलीस प्रशासनाना अपयश आले आहे. किरकोळ कारणाने खुनाच्या घटनेत वाढ झाल्याने धुळेकर अस्वस्थ झाले आहेत. धुळे शहर व परिसरात गेल्या वर्षभराचे कालावधीत एकामागे एक हत्याची मालिका सुरू आहे. त्यात 10 जुलै 2017 गुड्या हत्याकांड, 27 सप्टेंबर, 30 सप्टेंबर 2017 सागर पगारे याचा खून, 19 ऑक्टोबर 2017 दिनेश चौधरीची हत्या, 18 एप्रिल 2018 सनी साळवेची हत्या, 8 जून 2018 ला रावसाहेब पाटील व वैभव पाटील या पितापुत्राची हत्ता, 15 जून 2018 अय्यपन वीरा स्वामी या परप्रांतीयाची लूट करून हत्या करण्यात आली. वरील खून प्रकरणात जास्तीत जास्त तरुण युवकांचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. ही बाब धुळे शहरासाठी दुर्द्वी मानली जात आहे. तरूण युवक पैसे, दादागिरी, वर्चस्वाचा वाद, राजकारणातून मारामारी, भाऊबंदकी, चैनीसाठी चोर्या आणि हातात कमी वयात आलेला पैसा यामुळे गुन्हेगारीकडे वळलेत.
हे गुन्हे त्यांच्याकडून जाणीवपूर्वक झालेत. अटक केलेले तरूण चैनीसाठी गुन्हा केल्याचे कबूल करतात. उंची कपडे, बुट, गॉगल, महागडे घड्याळ, हॉटेलात खाणे-पीणे, मोटार सायकलवरून फिरणे आदी बाबींची चटक लागल्याने आणि ती पूर्ण करण्याची चटक लागल्याने ती पूर्ण करण्यासाठी आर्थिक स्थिती नसल्यामुळे त्यांनी चुकीचा मार्ग अवलंबल्याचे दिसते. जिल्ह्यात गुन्हेगारीमध्ये तरुणांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. शहरातील महाविद्यालय परिसरातील हॉटेल, चहा-वडापाव विकणार्या टपर्यांची तपासणी केल्यावर राजकीय संघटनेचे कार्यकर्ते विद्यार्थ्यांना आपल्या संघटनेकडे आकर्षित करताना दिसतात. मोर्चा, आंदोलन किंवा अन्य ठिकाणी शक्तीप्रदर्शन करताना युवकांची मागणी अधिक असल्यामुळे महाविद्यालयीन तरूणांचे वाढदिवस साजरे करणे, त्यांना हॉटेलमध्ये पार्टी दिली जाणे. शहराच्या काही उपनगरांत तर किरकोळ कारणावरून तरूण मुले चाकू, सुरे, तलवारी घेऊन बाहेर पडतात. आणि चोर्या मार्या करणारे पुढे दिशा भरकटल्यानंतर खुनापर्यंत मजल गाठतात. परिणामी गुन्हा दाखल झाल्यानंतर संपूर्ण आयुष्य बरबाद होते.
– ज्ञानेश्वर थोरात, धुळे
9850486435