धुळे शहर मराठा क्रांती मोर्चाने दणाणले!

0

धुळे । भीमा-कोरेगाव घटनेनंतर धुळे शहरातून 3 जानेवारी रोजी निघालेल्या मोर्चात छत्रपती शिवाजी महाराज, हिंदू हृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल करण्यात आलेला अपशब्दांचा वापर, व्यापार्‍याच्या दुकानांवर झालेली दगडफेक, तडीपार गुंडांचा मोर्चात सहभाग, शहरात वाढती गुंडगिरी, वाढती अपप्रवृत्ती या विरोधात मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून आज अतिशय शांततेत व शिस्तीत प्रति महामोर्चा निघाला. आग्रारोडने मोर्चा मार्गक्रमण करत असतांना लाखो मोर्चेकर्‍यांच्या हातात डौलाने फडकणारे हजारो भगव्या झेंड्यांमुळे वातावरण पूर्णपणे भगवामय बनले होते. या मोर्चात कुठलीही अनुचित घटना, कुठलीही आक्षेपार्ह घोषणा दिली गेली नसल्याने हा महामोर्चा सर्व धुळेकरांचे आणि व्यापारी, व्यावसायिकांचे आकर्षण ठरत होते. मोर्चाच्या मार्गातील शहरातील मुख्य बाजारपेठेत सर्वच व्यवहार, व्यवसाय, सुवर्ण पेढ्या सुरळीतपणे सुरु असल्याचे समाधानाचे दृष्य होते.

गुंडगिरीमुक्त धुळे शहराची मागणी
उत्साहात पण तितक्याच शिस्तीत आणि नियोजबध्दपणे निघालेल्या या मोर्चामुळे पोलिसामध्येही ’तणावमुक्त’ वातावरण दिसून येत होते. छत्रपती शिवरायांचा अपमान करणार्‍यांना शासन, राष्ट्रहितासाठी समान नागरि कायदा झालाच पाहीजे, गुंडगिरीमुक्त धुळे शहर झालेच पाहीजे, तडीपारांविरुध्द कठोर कारवाई झालीच पाहीजे, या प्रमुख मागण्यांचा या महामोर्चात सहभाग होता. मोर्चाला सुरवात झाली तेंव्हा मोर्चाचा अग्रभाग हा धुळे महानगर पलिकेजवळ होता तर मोर्चाचे शेवटचे टोक हे आग्रारोडवरील राजकमल टॉकीजजवळ असल्याचे निर्दशनास येत होते. सर्वच जाती धर्माचे शिवप्रेमी व व्यापारी, व्यावसायिक या महामोर्चात सहभागी झाले होते. शहरातुन निघणार्‍या या मोर्चाची वेळ सकाळी 11 वाजेच्या असली तरी सकाळी 9 वाजेपासूनच विविध भागातील तरूण हातात भगवे झेंडे घेवून मोर्चाच्या प्रारंभ स्थळाकडे जात होते. यावेळी ’जय भवानी- जय शिवाजी’चा जयघोष तसेच तुमचे आमचे नाते काय, जय जिजाऊ जय शिवराय या घोषणा देत होते. मोर्चासाठी येणार्‍या नागरिकांच्या वाहनांसाठी शहरातील ऐंशीफूटी रोड, गणपतीरोड वरील ट्रॅव्हल्स पॉईंट या ठिकाणी वाहनतळ असल्याने तेथे वाहने लावुन नागरिक मोर्चासाठी पायी निघाले होते.

छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन
या मोर्चात सहभागी होणार्‍या नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे म्हणून स्वतंत्र भांग्या मारूती विजय व्यायाम शाळा तसेच अनेक व्यापार्‍यांनी पाण्याचे जार मोर्चाच्या मार्गावर ठेवले होते. सराफा बाजारात व्यापार्‍यांनी मोर्चेकर्‍यांना चॉकलेटचे वाटप केले. तसेच चौका-चौकात शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पुजनही करण्यात आले. याशिवाय मराठा क्रांतीमोर्चानेही विविध समित्या गठीत करून प्रत्येकावर जबाबदारी देत नियोजन केले असल्याने अत्यंत शिस्तबध्द असा हा मोर्चा निघाला.

दोषी समाजकंटकांवर कारवाईची मागणी
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वधर्म समभावाचा विचार करुन सर्वांसाठी उपयोगी होईल, मार्गदर्शक ठरेल, अशी राज्यघटना देशासाठी लिहिली. त्या घटनेनुसार सर्व निती-नियमांचे पालन करण्याची जबाबदारी सर्व भारतीय नागरीकांवर येवून ठेपते. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी घालून दिलेल्या आदर्शाचे पालन करण्याची जबाबदारी विशेष करुन दलित बांधवांवर येवून ठेपते. परंतू 3 जानेवारी रोजी भिमा कोरेगांव प्रकरणाचे पडसाद धुळ्यात उमटले. यात दडपशाहीचे व गुंडगिरी प्रवृत्तीचे दर्शन काही समाजकंटकांनी देवून तोडफोड करुन शहरात दहशत निर्माण केली. बसेसच्या काचा फोडून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले. ही प्रवृत्ती धुळे शहरासह जिल्ह्यात पुन्हा डोकेवर काढू नये त्यासाठी त्यातील दोषी समाजकंटकांवर कारवाई करण्यासाठी आज सर्व बहुजन समाज या मोर्चात एकत्रीत आला आहे. याची दखल घेवून पोलीस प्रशासनाने संबंधीतांवर त्वरीत कारवाई करावी, अशी मागणी आ.शरद पाटील यांनी केली आहे.

निष्क्रिय अधिकार्‍यांच्या बदलीची मागणी
अखंड भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय यांचा दि.3 जानेवारी रोजी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंद मध्ये काही हुल्लडबाज, उद्रेकी तरूणांनी अश्‍लिल भाषेत अवमान केला याचा निषेध करण्यासाठी आज मराठा मोर्चासह सर्वपक्षीय नागरिकांनी पुकारलेला महामोर्चा यशस्वी झाला आहे. आम्ही काढलेल्या मोर्चात कुणाचेही नुकसान केले नाही कारण आम्ही देशद्रोही नाहीत. दि.3 जानेवारी रोजी महाराष्ट्र बंद दिनी काही हुल्लडबाज, उद्रेकी तरूणांनी छत्रपती शिवरायांसह, बाळासाहेब ठाकरे व इतर राष्ट्रपुरुषांचा अवमानकारक शब्द वापरून अपमान केला त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. यापुढे भविष्यात कोणत्याही जाती-धर्माच्या नागरिकांवर अन्याय झाल्यास तो सहन केला जाणार नाही त्यासाठी आम्ही युवकांचे संगठन बनवित असून यापुढे अशा अन्यायासमोर न झुकता आम्ही लढा देणार असल्याचे मनोज मोरे यावेळी म्हणाले. तर भीमा कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचारात मृत पावलेल्या राहुल फटांगळे यांच्या नातेवाईकांना 1 कोटी रूपयांचे सात्वन शासनाने द्यावे अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. तसेच निष्क्रिय अधिकार्‍यांच्या त्वरीत बदल्या करण्यात याव्या अशी मागणीही त्यांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात केली असल्याचा उल्लेख केला.

व्यवहार सुरळीत : मोर्चाच्या मार्गातील सर्वच व्यापारी, व्यावसायिकांनी आपापले व्यवसाय सुरु ठेवले होते. इतकेच नव्हे तर शहरातील संपुर्ण व्यवसाय,व्यवहार सुरळीतपणे सुरु होते. शिवाय मोर्चाच्या मार्गातील सर्वच जण मग ते कुठल्याही जाती,धर्माचे असो या मोर्चाच्या स्वागतासाठी उत्सुक असल्याचे दिसून आले. ज्या ठिकाणी दुकाने किंवा व्यावसाय बंद होते त्या भागात मोर्चेकर्‍यांनी व्यापार्‍यांना विनंती करुन त्यांचे दुकान पुन्हा उघडण्यास सांगितले आणि सदरच्या व्यापार्‍यांनी त्यांना सकारात्मक प्रतिसादही दिला. दरम्यान शहरातील महामोर्चाच्या पार्श्‍वभूमीवर मनोहर टॉकीज परिसर ते जिल्हाधिकारी कार्यालया दरम्यान आग्रारोडवर तसेच महापालिका परिसरात चौकात भोंगे लावून त्यावर छत्रपतींच्या कारकिर्दीचे वर्णन करणारे शाहीरी पोवाडे ऐकविले जात होते.

मोटारसायकल रॅली
या महामोर्चाच्या अनुषंगाने आज सकाळी 10 च्या सुमारास तरूणांची एक मोटारसायकल रॅली काढण्यात आली. प्रत्येक मोटारसायकलीवर भगवा ध्वज हातात घेवून तसेच घोषणा देणारे तरूण होते. मनोहर टॉकीज परिसरात असलेल्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करून मोर्चाला सुरूवात झाली. हा मोर्चा आग्रारोड मार्गे शिस्तीने आणि उत्साहात पुढे सरकत होता. शहरातील प्रभाकर टॉकीज, पाचकंदील चौक, शहर पोलीस चौकी, सराफ बाजार, बॉम्बे लॉज, कराचीवाला खुंट, महानगरपालिका या ठिकाणी तरूणांचे जथ्थ्येच्या जथ्थे या मोर्चात सहभागी होत होते.

उद्रेकाला वाट देण्यासाठी मोर्चा
छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या 50 वर्षांच्या कारकीर्दीत कोणत्याही प्रकारे भेदभाव न करता सर्व जाती धर्माच्या लोकांवर सारखेच प्रेम केले. महिलांवर, जनतेवर अन्याय-अत्याचार करणार्‍यांची जात न विचारता त्याला कठोर शिक्षा केली. अशा या महापुरुषाचा अवमान करणारी प्रवृत्ती समाजाला घातक असून ही प्रवृत्ती ठेचून काढली पाहिजे. हा मोर्चा कोणत्याही जाती-धर्माविरुद्ध नसून गुंड प्रवृत्तीविरुद्ध आहे. छत्रपती शिवाजी महाराज, आदरणीय बाळासाहेब ठाकरे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या आदर्श आचार-विचारांनी समाजहिताचे कार्य केले. त्यांचा अवमान करणारी प्रवृत्ती ही निश्‍चितच समर्थनीय नाही. यासाठी बहुजन समाजामध्ये या प्रवृत्तीविरुद्ध उद्रेक होता. या उद्रेकाला वाट मोकळी करुन देण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला. महापुरुषांचा अवमान करणार्‍या समाजकंटकांवर गुन्हा दाखल झाला पाहीजे. तसेच या गुंड प्रवृत्तीला पाठीशी घालणार्‍या पोलिसांवरही कारवाई झाली पाहीजे. अशी मागणी माजी आमदार शरद पाटील यांनी या मोर्चा दरम्यान आयोजित जाहीर सभेत बोलतांना केली.

वाहतुकीचा खोळंबा :
शहरात मोर्चाच्या पार्श्‍वभूमीवर वाहतुकीचे नियोजन केले जात होते. सर्व व्यवहार सुरळीत ठेवण्याचे आवाहनच मोर्चाच्यावतीने करण्यात आले असल्याने कुठेही भीतीचे अथवा दडपणाचे वातावरण नव्हते. मात्र शहर वाहतूक शाखेचे निरिक्षक मुंढे हे रस्त्याने जाणार्‍या प्रत्येकच वाहनाला मग ते दुचाकी असो, तीनचाकी असो की चारचाकी थांबवत असल्याने वाहतुकीचा नाहक खोळंबा होवून वाहतूक विस्कळीत झाल्याचे चित्र दिसत होते.