धुळे शासकीय रुग्णालयात आरोग्यसेवेचा बोजवारा उडाल्याने त्रास

0

धुळे। धु ळे शिवसेनेच्या वतीने शासकीय रुग्णालयातील विविध मागण्यांसाठी अधिष्ठाता गुप्ता यांना निवेदन देण्यात आले. सबंधित मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देखील या निवेदनात देण्यात आला आहे. शासकीय महाविद्यालयात धुळे जिल्ह्यातील तसेच जळगाव, नाशिक, नंदुरबार व मध्यप्रदेश आणि गुजरात राज्यातील रुग्ण देखील दाखल होतात. बाह्यरुग्ण विभाग व आंतर रुग्ण विभाग येथे रोज येणार्‍या रुग्णांची संख्या हजारोच्या घरात आहे. मात्र सुविधांच्या अभावाने रुग्णांना व नातेवाईकांना त्रास सहन करावा लागत आहे.

प्लेटलेट्सची सुविधा करावी : निवेदनात म्हटले आहे की, महाविद्यालयातील रक्तपेढीत प्लेटलेट उपलब्ध करण्याची सोय नाही. डेंग्यू, मलेरिया व इतर अनेक आजारांमध्ये प्लेटलेटची मोठ्या प्रमाणात गरज भासते. आपल्या शासकीय महाविद्यालयात प्लेटलेट उपलब्ध नसल्याकारणाने उपचार करण्यात अडथळे निर्माण होतात. अनेक गरीब रुग्ण प्लेटलेटची गरज असल्यामुळे खाजगी दवाखान्यात आर्थिक परिस्थिती नसतांना देखील उपचार घेतात. प्लेटलेटचा खर्च देखील मोठा आहे. सिंगल डोनर प्लेटलेट्ची एक पिशवी खाजगी रक्तपेढीत किमान 8000 रुपयांना मिळते आणि रँडम डोनर प्लेटलेट्ची पिशवी किमान 800 रुपयांना मिळते. डेंग्यू आणि मलेरिया सारखे आजार आता येणार्‍या पावसामुळे फोफावतील, त्यामुळे शासकीय महाविद्यालयात प्लेटलेट व इतर रक्त घटकांची सोय उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी निवेदनात केली आहे.

…तर तीव्र आंदोलन करणार
शासकीय महाविद्यालयांत रुग्णांसाठी कायमस्वरूपी स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध नाही. पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी सोय तातडीने करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. तसेच सी. टी. स्कॅन मशीन सुस्थितीत असणे अपेक्षित असतांना तसे मात्र प्रत्यक्ष दिसून येत नाही. अस्थिरोग विभागातील ऑपरेशन थियेटर मधील सी- आर्म मशीन देखील अनेक महिन्यांपासून नादुरुस्त आहे. सी. टी स्कॅन मशीन व सी आर्म मशीन वेळोवेळी नादुरुस्त असल्यामुळे अनेक रुग्णांना तातडीचे उपचार मिळण्यास विलंब होतो व प्रसंगी वाद निर्माण होतात. तरी कि सी. टी स्कॅन सेवा व सी-आर्म मशीन सुरळीत व सुस्थितीत करावे अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. या विषयांना तातडीने सोडविण्यात यावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

यांची होती उपस्थिती
यावेळी कॅन्सरतज्ञ व शिव आरोग्य सेनेच्या प्रदेशाध्यक्षा डॉ. माधुरी बोरसे, जिल्हाप्रमुख हिलाल माळी, माजी जिल्हाप्रमुख अतुल सोनावणे, माजी आ. शरद पाटील, माजी जिल्हाप्रमुख राजू पाटील,भूपेंद्र लहामगे, महेश मिस्तरी, संजय गुजराथी, सुनील बैसाणे, भगवान गवळी, कैलास पाटील, पंकज गोरे, राजेंद्र गुजर, प्रफुल्ल पाटील, दिनेश पाटील, धिरज पाटील, रामदास कानकाटे, हेमाताई हेमाडे, वंदना पाटील, देविदास लोणारी, नरेंद्र अहिरे, किरण जोंधळे, योगेश चौधरी, डॉ. सुशील महाजन, संजय जवराज, सुनंदा तावडे, नंदा माळी, रंजना पाटील, उज्वला काटकर, कविता ब्रम्हे, मंगला अमृतकर, सुजाता जगताप, मीनाक्षी मिस्तरी, लता पाटील, पंकज भारस्कर आदी उपस्थित होते.