नवापूर । नवापूर शहरातून जाणार्या धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. महामार्गावर मोठे खड्डे पडले आहेत, त्यामुळे वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. रस्त्यावरील खड्डे वाचवत वाहनचालक ञस्त होऊन अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. शहरातील देवळफळी भागातून जाणार्या महामार्गावरील पुलाजवळील रस्त्यावर मोठा खड्डा पडला असून यामुळे या ठिकाणी अनेक अपघात झाले आहेत. या खड्ड्यात अनेक दुचाकी वाहने पडुन अपघात घडत आहेत, तर अनेकांचा जीव या खड्ड्याने घेतला आहे.
नेत्यांना दुरवस्था दिसत नाही का? : शहरातील एक फोटोग्राफर व ग्रामीण भागातील दोन युवकांचा बळी या खड्याने घेतला आहे, अनेक वेळा निवेदन तक्रारी देऊन ही महामार्गावरील खड्डे बुजविण्यात येत नसल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या महामार्गावरून अनेक मंञी, आमदार, लोकप्रतिनिधी ये-जा करत असतात त्यांना महामार्गावरील पडलेले खड्डे व झालेली दुरावस्था दिसत नाही का? असा सवाल नागरिक करीत आहेत. मागच्या वर्षी या महामार्गावरील खड्डे व दुरुस्ती बाबत अनेक तक्रारी व निवेदने देण्यात आली होती. अनेक अपघात झाले होते काही सामाजिक कार्यकर्ते व संघटनांनी आंदोलन केल्यानंतर थातुरमातुर डागडुजी करण्यात आली होती या वर्षी तीच परिस्थिती निर्माण झाली असून बेडकी ते देवळफळी पर्यंत रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे.
जीव मुठीत घेऊन प्रवास : महामार्गावरील साईड पट्ट्या खोलवर जाऊन त्या बुजून गेल्या असल्याने दुचाकीच्या अपघाताचे प्रमाण वाढले आहे. महामार्गावर काटेरी झुडपे ठिकठिकाणी वाढली असल्याने समोरून येणारे वाहन दिसत नाही. यामुळे देखील अपघात घडत आहेत. नागरिकांना येथून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. वाहनांची प्रचंड संख्या व एकतर्फा रस्ता यामुळे महामार्गावर प्रवास फारच जीवघेणा प्रवास झाला आहे. महामार्गावरील चौपदरीकरण केव्हा होईल याची प्रतीक्षा करावी लागत आहे. अनेक लोकांनी लोकसहभाग घेऊन महामार्गावरील खड्डे बुजण्याची तयारी दर्शविली आहे
खड्ड्यांचा अंदाज येत नाही
एक ते सव्वा फुट खड्डा व असे लहान मोठे खड्डे वाहन चालकांना हैराण करत आहेत. येथून जड वाहने रोज ये-जा करत असतात. रोज हजारो वाहनांचा राबता येथून पास होतो. अनेक राज्यातील वाहने, कंटेनर, अनेक चाकी अवाढव्य वाहने या मार्गावरून ये जा करतात. रात्री वाहन चालकांना या खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघात होतो. या मार्गावरून ये जा करतांना जीव मुठीत धरून जावे लागत आहे पडलेले हे खड्डे मृत्यू खड्डे झाले आहेत त्यामुळे महामार्ग हा मृत्युमार्ग झाला आहे. वारंवार निवेदन देऊन ही महामार्गावरील खड्ड्यांच्या दुरूस्तीकडे लक्ष दिले जात नाही.
महामार्गावरील रस्त्याची दुरुस्तीच्या संदर्भात गेल्या वर्षी आंदोलन व उपोषण केले होते. अनेक वेळा तक्रारी करून निवेदन देण्यात आले आहे. महामार्गावरील पडलेले खड्डे जर लवकरात लवकर बुजविले गेले नाहीत तर मी महामार्गावर भीक मांगो आंदोलन करून त्या पैशांनी खड्डे बुजणार आहे.
-मंगेश येवले, सामाजिक कार्यकर्ते, नवापूर