धुळ्याचे वैभव असलेली प्रताप मिल सुरु करण्यासाठी प्रयत्नशील

0

धुळे। धु ळे शहराची वैभव असलेली प्रताप मिल सुरु करण्यासाठी प्रयत्नशील राहु असे प्रतिपादन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांनी केले. प्रताप मिल येथे त्यांच्या हस्ते 41 कामगारांना 3 कोटी 68 लाख 62 हजार 109 पेक्षा जास्त व्हीआरएस रकमेचे वाटप करण्यात आले त्याप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमास प्रताप मिल कामगार नेते मच्छिंद्र येरडावकर, धुळे टेक्सटाईल मिलचे मॅनेजर कापडणीस, हिरामण गवळी, शशी मोगलाईकर, बापू शेलार, दयाराम पाटील, केदार मोराणकर, विजय पाच्छापूरकर, रत्ना बडगुजर, नगरसेविका वैभवी दुसाणे तसेच कामगार व त्यांचे कुटूंबिय मोठया संख्येने उपस्थित होते.

मिलला अद्ययावत करणार
मंत्री डॉ.सुभाष भामरे म्हणाले, धुळ्याच्या विकासात प्रताप मिलचे योगदान मोठे आहे. त्यातून अनेकांना रोजगार उपलब्ध झाला होता. त्यामुळे मिल पुन्हा सुरु व्हावी तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून आपण प्रयत्नशील आहोत धुळे येथील प्रताप मिल ही नव्याने सुरु करणारच असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. नव्याने सुरु करण्यात येणारी मिल अद्ययावत व चांगल्या प्रकारची असेल. धुळे शहराची शान व वैभव असलेली प्रताप मिल शहराच्या आत्मीयतेचा व येथील कामगारांच्या व्हीआरएसचा प्रश्न होता. या कामगारांचा प्रश्न सोडविणे हे मी मनापासून ठरविले.

प्रश्न मार्गी लावणार
धुळे बरोबर चाळीसगांव व महाराष्ट्रातील सर्व कामगारांचे प्रश्न मार्गी लावण्यात आले. कामगारांच्या कष्टाचा, घामाचा पैसा मिळणे हा त्यांचा न्याय हक्क होता तो मिळवून देणे आपले कर्तव्यच होते. प्रताप मिल मधील उर्वरित कामगारांचा प्रश्न लवकरच मार्गी लावण्यात येईल. धुळे-मुंबई कॅरिडोरच्या माध्यमातून पुढील काळात शहराचा चेहरा मोहरा बदलेला आपणास दिसेल. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन रामकृष्ण बगरे यांनी केले.