धुळ्यातील अवधमानमधील सेवा ऑटोमोटीव्हमध्ये तिजोरीच लांबवली : सहा लाखांच्या मुद्देमालासह आरोपी जाळ्यात

मोहाडी पोलिसांची कामगिरी : ट्रकसह सहा लाखांचा मुद्देमाल जप्त

भुसावळ : धुळ्यातील अवधान एमआयडीसी भागातील सेवा ऑटोमोटीव्ह कंपनीच्या कार्यालयातील कॅश कॅबीनमधील तीन लाख एक हजार 786 रुपयांची रोकड असलेली तिजोरी चोरट्यांनी 16 फेब्रुवारी लांबवली होती. या प्रकरणी मोहाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी मोहाडी पोलिसांनी गुन्ह्याची उकल करीत एका आरोपीच्या मुसक्या आवळल्या असून दोघे पसार आहेत. रोहित बदामसिंग राठोर (26, टेमरणी, बेरामपूर, गोगाव, जि.खरगोन, मध्यप्रदेश) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

चोरट्यांनी लांबवली होती तिजोरी
धुळ्यातील अवधान भागातील एमआयडीसीतील सेवा ऑटोमोटीव्ह लि.कंपनीच्या कॅश कॅबीनमधील तिजोरी चोरट्यांनी 16 रोजी लांबवली होती. या प्रकरणी कॅशियर भिला हिलाल पाटील यांच्या फिर्यादीवरून मोहाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरटे जीजीटी लिहिलेल्या ट्रकमध्ये तिजोरी टाकताना दिसून आल्यानंतर त्याआधारे पोलिसांनी ट्रक क्रमांक (एम.पी.43 एच.0664) चा शोध लावत तीन आरोपींची नावे निष्पन्न केली व रोहित राठोरच्या मुसक्या आवळल्या. आरोपीच्या ताब्यातून त्याच्या हिश्यात आलेली 50 हजारांची रोकड, पाच हजार रुपये किंमतीची गोदरेज कंपनीची तिजोरी, पाच लाख 50 हजार रुपये किंमतीची ट्रक मिळून सहा लाख पाच हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळ्याचे प्रभारी पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपअधीक्षक दिनकरराव पिंगळे, धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, एएसआय शाम निकम, शाम काळे, प्रभाकर ब्राह्मणे, किरण कोठावदे, राहुल पाटील, गणेश भामरे, जितेंद्र वाघ, सचिन वाघ, धीरज गवते, राहुल गुंजाळ, जयकुमार चौधरी आदींच्या पथकाने केली. तपास पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे करीत आहेत.