गरीबांचे संसार उघड्यावर ; लाखोंचे नुकसान ; एका पाठोपाठ पेटली सात घरे
धुळे- शहरातील चाळीसगाव रोडवरील पूर्व हुडको भागात असलेल्या अतिक्रमित वस्तीत एका घरात शॉर्टसर्किटने आग लागल्यानंतर पाहता-पाहता आगीने रौद्र रूप धारण केल्याने सात घरांचा कोळसा झाला. शुक्रवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास लागलेल्या आगीनंतर पोलिस प्रशासनासह अग्निशमन दलाने धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. आधीच दाटीवाटीने असलेली वसाहत व रस्ते नसल्याने आग विझवताना अनेक अडचणींचा अग्निशमन दलाला सामना करावा लागला. या आगीत सुमारे 10 ते 15 लाखांचे नुकसान झाल्याचे समजते. पाहता-पाहता संसारोपयोगी साहित्याची राख-रांगोळी झाल्याने महिलांना रडू कोसळले.
एका पाठोपाठ पेटली सात घरे
चाळीसगाव रोडवरील कब्रस्तानच्या पुढे असलेल्या ईस्माईल गॅरेजमागील वसाहतीत एका घरात महिला स्वयंपाक करीत असतानाच शॉर्ट सर्किटने होवून आग लागल्याने महिलेने घराबाहेर धाव घेतली तर पाहता-पाहता आगीने रौद्र रूप धारण केल्याने अन्य सहा घरांनाही आगीचा फटका बसला. काही तरुणांनी साहस धावत पेटत्या आगीतून सिलिंडर बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला. या आगीत सैय्यद फरमान सै.रज्जाक, गुलाम उस्मान पिंजारी, महेबूब सैय्यद मुनाफ सैय्यद, शब्बीर याकुब शेख मण्यार, अमीना दादा सैय्यद, वकील मजिंदर खाटीक, लतीफ मुलकी आदी रहिवाशांच्या घरातील संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाल्याचे सांगण्यात आले. प्रशासनाने तातडीने पंचनामा करून या रहिवाशांना भरपाई देण्याची मागणी होत आहे.