धुळ्यातील युवकाच्या खुनाचा उलगडा ; दोघांना अटक

0

24 तासात देवपूर पोलिसांकडून गुन्ह्याची उकल ; पत्नीची छेडखानी केल्याने काढला काटा

धुळे – शहरातील मोची वाडा भागातील विष्णू नगरातील रहिवासी सतीश किसन धुर्मेकर (35) हा युवक 5 रोजी पहाटे देशी दारू दुकानाजवळ गंभीर अवस्थेत आढळला होता. त्यास उपचारार्थ नाशिक सामान्य रुग्णालयात हलवल्यानंतर तेथे त्याचा बुधवारी पहाटे मृत्यू झाला होता. या घटनेनंतर संतप्त जमावाने संशयीतांना अटक करून त्यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी अंत्ययात्रा देवपूर पोलिस ठाण्यात नेली होती तर विष्णू नगरातील देशी दारू दुकानावरही हल्लाबोल करून मोठ्या प्रमाणावर नुकसान करण्यात आले होते. पोलिसांनी दोषींवर कारवाईचे आश्‍वासन दिल्यानंतर अजय बाबूलाल बरेलीकर व पारस बाबूलाल बरेलीकर यांना अटक केली आहे. मयत हा आरोपी अजयच्या पत्नीची छेडखानी करीत असल्याच्या कारणावरून त्याचा काटा काढण्यात आल्याची आरोपींनी कबुली दिली आहे. दरम्यान, आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

24 तासात गुन्ह्याची उकल
सोमवारी रात्री मयत सतीश घुर्मेकर हा भजनी मंडळासोबत गेला होता मात्र रात्री उशिरापर्यंत तो घरी परतला नाही तर पहाटे विष्णू नगरातील दारू दुकानाबाहेर तो गंभीर जखमी अवस्थेत आढळला होता. सुरुवातील शहरातील सामान्य रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यास नाशिक सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले मात्र तेथे त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर संतप्त जमावाने विष्णू नगरातील दारू दुकानाची मोठ्या प्रमाणावर तोडफोड करीत नुकसान केले होते तर अंत्ययात्राही देवपूर पोलिस ठाण्यात आणून दारू दुकानदारासह दोषींवर कारवाईची मागणी करीत दिड तास ठिय्या आंदोलन केले होते. पोलिसांनी या प्रकरणी अजय बाबूलाल बरेलीकर व पारस बाबूलाल बरेलीकर यांना अटक केली आहे. पोलिस अधीक्षक विश्वास पांढरे, अपर पोलिस अधीक्षक डॉ.राजू भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक सचिन हिरे, देवपूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दिलीप गांगुर्डे, सहाय्यक पोलिस निरीक्षक अकबर पटेल, स्वप्नील कोळी, पंकज चव्हाण, प्रदीप सोनवणे, संजय चिंचोलीकर, माया ढोले, जब्बार शेख, किरण सावळे, पंकज पाटील, आबासाहेब राठोड आदींनी हा गुन्हा उघडकीस आणला.