धुळ्यातील लाचखोर पशुसंवर्धन विकास अधिकार्‍यासह वरीष्ठ लिपिक जाळ्यात

0

पशुसंवर्धन विभागात लावलेल्या वाहनाचा धनादेश काढण्यासाठी स्वीकारली साडेचार हजारांची लाच

धुळे- भाडेतत्त्वावर लावलेल्या वाहनाचे डिपॉजिटसह बिलाचा धनादेश काढण्यासाठी चार हजार 500 रुपयांची मागणी करणार्‍याधुळे पशुसंवर्धन विकास अधिकारी डॉ.राजेंद्र आत्माराम पाटील (57) व वरीष्ठ लिपिक बाळकृष्ण सुकलाल देशमुख (56) यांना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी दुपारी सापळा रचून अटक केली. आरोपींनी 10 रोजी पैशांची मागणी करण्यात आल्यानंतर तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार दिल्यानंतर 11 रोजी सापळा यशस्वी करण्यात आला. तक्रारदाराला आरोपी डॉ.राजेंद्र पाटील यांनी लाचेची रक्कम बाळकृष्ण देशमुख यांना देण्याचे सांगल्यानंतर पंचांसमक्ष आरोपींना अटक करण्यात आली. पोलीस उपअधीक्षक सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक पवन देसले व सहकार्‍यांनी ही कारवाई केली.

लाचखोरांवर कारवाईसाठी संपर्काचे आवाहन
शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तत्काळ धुळे एसीबी कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांक 02562-234020 तसेच मोबाईल क्रमांक .8766858652 वा टोल फ्री क्रमांक 1064 वर संपर्क साधण्याचे आवाहन पोलिस उपअधीक्षक सुनील कुराडे यांनी केले आहे.