धुळ्यातील सहा गुन्हेगारांना तडीपाराचे आदेश

0

धुळे। शहरातील सहा सराईत गुन्हेगारांना धुळ्यातून तीन महिन्यांकरीता तडीपार करण्याचे आदेश उपविभागीय दंडाधिकारी गणेश मिसाळ यांनी दिले आहेत. पोलीस अधीक्षक एम.रामकुमार, अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने शहरातील व जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार, समाजकंटकांचे हद्दपार प्रस्ताव तयार करुन उपविभागीय दंडाधिकारी गणेश मिसाळ यांच्याकडे पाठविले होते. याकामी स्थानिक गुन्हे शाखेने सतत पाठपुरावा केला. यामुळे प्रांताधिकारी गणेश मिसाळ यांनी मलिक उर्फ मनोहर गंभीर बैसाणे, रा.भीम नगर, साक्रीरोड धुळे, विक्की उर्फ विक्रम शाम गोयर रा.अंबिका नगर, बबलू उर्फ राहुल भरत खरात रा.धुळे, निहाल पारस परदेशी रा.नेहरू चौक, मेहुल दत्तात्रय चत्रे, रा.एस.टी. कॉलनी, विजय आसाराम फुलपगारे , रा.गल्ली नं.14, जुने धुळे या सहा जणांना धुळ्यातून हद्दपार केले आहे.

गंभीर स्वरूपाचे गुन्हे
या सहा जणांविरुध्द विविध गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असून त्यांच्यावर प्रतिबंधक उपाययोजनाही करण्यात आल्या. परंतु सदरच्या गुन्हेगारांच्या वर्तनात कोणतीही सुधारणा झालेली नाही. या उलट सदर परिसरात त्यांची प्रचंड दहशत असून उघडपणे त्यांच्या विरूद्ध कोणी बोलण्यास धजत नाही. त्यांच्यापासून लोकांच्या मालमत्तेस व जीवितास धोका निर्माण झाला असून सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था भंग होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले.