धुळे । शहरातील एसएसव्हीपीएस कॉलेजच्या मैदानावर आजपासून राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन अॅग्रोवर्ल्ड- 2018 ला सुरुवात झाली आहे. शेती उपयोगी नवीन यंत्रे, तंत्रे, सिंचन प्रणाली, नामांकित कंपन्यांची ट्रॅक्टरे व अवजारे, स्प्रे पंप, फळबाग छाटणीपासून ते परसबागेतील मशागतीसाठी उपयुक्त शेती साहित्ये, विविध जातीचे पशुधन, मोत्याच्या शेतीचे प्रात्यक्षिक, यासह इतर माहितीची रेलचेल असल्याचे अॅग्रोवर्ल्डचे आयोजक शैलेंद्र चव्हाण यांनी म्हटले आहे. माजी कृषीमंत्री रोहिदास पाटील यांच्याहस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. 5 ते 8 जानवारी दरम्यानच्या चार दिवसीय कृषी प्रदर्शनासाठी राज्य सरकारचा कृषी विभाग, आत्मा, जिल्हा परिषद तसेच इतर शासकीय संस्थांचे सहकार्य लाभणार आहे. शासकीय विभागांसाठी स्वतंत्र दालन असल्याने शेतकर्यांना सर्व शासकीय योजनांची माहिती एकाच छताखाली मिळणार आहे.
प्रदर्शनात 175 हून अधिक स्टॉल्स
जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक तर सहप्रायोजक प्लांटो कृषी तंत्र, दत्त ड्रिप इरिगेशन, केसरी टुर्स आहेत. 4 एकर प्रक्षेत्रावरील या प्रदर्शनात 175 हून अधिक स्टॉल्स आहेत. 5 ते 8 जानवारी दरम्यानच्या चार दिवसीय कृषी प्रदर्शनासाठी राज्य सरकारचा कृषी विभाग, आत्मा, जिल्हा परिषद तसेच इतर शासकीय संस्थांचे सहकार्य लाभणार आहे. प्रदर्शनस्थळी ट्रॅक्टरे, अवजारे व मशिनरी स्वतः हाताळून खात्री करण्यासाठी मोठी जागा राखीव ठेवली आहे. त्याचाही लाभ शेतकर्यांना घेता येणार आहे.
विविध उपक्रमांबाबत केले मार्गदर्शन
पशुपालकांसाठी पर्वणी पशुपालकांसाठी हिरव्या चार्याचे व्यवस्थापन, मूरघास, हायड्रोपोनिक फॉडर, अॅझोलाची प्रात्यक्षिकासह माहिती देण्याची व्यवस्था आहे. दूध काढणी यंत्रासह जिवंत पशुधन प्रदर्शनात प्रत्यक्ष पहायला मिळणार आहेत. याव्यतिरिक्त शेततळ्यातील त्रिस्तरीय मत्स्यपालन आणि शेततळ्यांचे विविध आकार, शेळ्या कोंबड्या, दुधाळ गायींच्या जातींची इत्युभूत माहिती पशुसंवर्धन विभागाच्या स्टॉलला भेट देणार्या शेतकर्यांना मिळू शकणार आहे. त्यामुळे पशुपालकांसाठी हे प्रदर्शन पर्वणीच ठरणार आहे, असा विश्वास शैलेंद्र चव्हाण यांनी व्यक्त केला.
यांची उपस्थिती
यावेळी आमदार कुणाल पाटील, जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरन डी., जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश सांगळे, आत्माचे प्रकल्प संचालक डॉ.बी.एन.पाटील, कृषी विकास अधिकारी बैसाणे, दत्त ड्रिपचे कार्यकारी संचालक जितेंद्र पवार, समाज कल्याण सभापती मधुकर गर्दे, डॉ.दरबारसिंग गिरासे, मुकुंद कोळवले आदी उपस्थित होते.