धुळे जिल्हा राष्ट्रवादी महिला आघाडी अध्यक्षांच्या होता मुलगा
धुळे । शहरातील एसएसव्हीपीएस महाविद्यालयाच्या अकरावी विज्ञान शाखेच्या 18 वर्षीय विद्यार्थ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. निखिल सुनील पावरा असे मृताचे नाव असून तो राष्ट्रवादी महिला आघाडीच्या धुळे ग्रामीण जिल्हाध्यक्षा ज्योती पावरा यांचा मुलगा आहे. 19 जानेवारीला त्याचा वाढदिवस होता. वाढदिवसाच्या दोन दिवसांपूर्वीच घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे. शहरातील देवपूर भागात वाडीभोकर रोडवर असलेल्या अभियंता नगरात ज्योती पावरा यांचे निवासस्थान (प्लॉट नं.24) आहे. त्या गेल्या तीन दिवसांपासून जळगाव जिल्ह्यातील वैजापूर (तालुका चोपडा) या त्यांच्या माहेरी गेल्या आहेत.
सकाळी आले उघडकीस
बुधवारी सकाळी निखिलने गळफास घेतल्याचे सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास त्याचे वडील सुनील पावरा यांच्या लक्षात आले. या प्रकरणी देवपूर पश्चिम पोलिसांनी घटनास्थळी धावत घेत पंचनामा करून मृतदेह जिल्हा रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. दरम्यान, निखिलच्या आत्महत्ये मागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यांना कोणतीही चिठ्ठी आढळलेली नाही. पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.