भुसावळ/धुळे : धुळे स्थानिक गुन्हे शाखेने वाढत्या दुचाकी चोरींच्या पार्श्वभूमीवर दोन अल्पवयीन चोरट्यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून अडीच लाख रुपये किंमतीच्या चोरीच्या सात दुचाकी जप्त केल्या तर कारवाईदरम्यान एक अल्पवयीन चोरटा पसार होण्यात यशस्वी झाला. धुळे, दोंडाईचा, शहादा व नंदुरबार शहरातून या दुचाकी चोरण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
अडीच लाखांच्या दुचाकी जप्त
चाळीसगाव रोड चौफुली भागात अल्प किंमतीत चोरटे दुचाकी विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर सापळा रचून दोघा अल्पवयीन चोरट्यांना ताब्यात घेण्यात आले. अल्पवयीन चोरट्यांकडून दोंडाईचा पोलिस ठाणे हद्दीतील तीन, शहादा व नंदुरबार पोलिस ठाणे हद्दीतील प्रत्येकी एक तर धुळे शहर पोलिस ठाणे हद्दीतून लांबवलेल्या दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. बजाज, होंडा व डिस्कव्हर कंपनीच्या या दुचाकी असून संबंधित पोलिस ठाण्यात दुचाकी चोरी प्रकरणी गुन्हा दाखल असल्याचे स्पष्ट झाले आहे.
यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत, एपीआय प्रकाश पाटील, योगेश राऊत, बाळासाहेब सूर्यवंशी, संजय पाटील, प्रकाश सोनार, संदीप सरग, अशोक पाटील, कुणाल पानपाटील, रवीकिरण राठोड, उमेश पवार, विशाल पाटील आदींच्या पथकाने केली.