दुपारपर्यंत गुन्ह्याची उकल होण्याची शक्यता
धुळे : शहरातील मालेगाव रोडवरील यलम्मा देवी मंदीर परीसरातील विठ्ठल (अप्पा) गवळी यांच्या न्यू प्रतीक डेअरीवर गुरूवारी रात्री साडेनऊ-पावणेदहा वाजेच्या सुमारास अग्रसेन चौकाकडून दुचाकीवरून आलेल्या तिघांनी गोळीबार करीत दहशत निर्माण करून सुमारे 25 हजारांची रोकड लांबवल्याने शहरात खळबळ उडाली. आरोपींनी काऊंटरच्या काचेवर पिस्तुलातून गोळी झाडल्यानंतर डेअरी मालक विठ्ठल गवळी व कर्मचा-यांची भीतीने बोबडी वळाली. ते गल्ल्यावरून उठताच दोघांनी गल्ल्यातील रोकड ताब्यात घेऊन लगेच दुचाकीवरून दसेरा मैदानकडे जाणार्या रस्त्याने पळ काढला. मालक व कर्मचार्यांनी पाठलाग करू नये यासाठी दोघांपैकी एकाने फरशी उचलून दुकानाच्या दिशेने फेकली आणि लगेच पळ काढला. दरम्यान, ‘दैनिक जनशक्ती’ला मिळालेल्या खास माहितीनुसार आरोपींचा शोध लागला असून शुक्रवारी दुपारपर्यंत आरोपी शहर पोलिसांच्या ताब्यात असतील, असे सूत्रांनी सांगितले.
दुकाने बंद : पोलिसांची धाव
गोळीबारानंतर दुकानदारांनी तत्काळ दुकाने बंद केली. वृत्त कळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिलीप गांगुर्डे, चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सतीश सपकाळे हे फौजफाट्यासह घटनास्थळी पोहचले. रात्री उशीरा या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.