धुळे। मध्यरात्रीच्या अंधारात घरात झोपलेल्या तरुणीशी जबरदस्ती करीत तीचा विनयभंग करण्याचा धक्कादायक प्रकार धुळ्यातील आझादनगर परिसरात घडला.
याप्रकरणी 24 वर्षीय तरुणीने चाळीसगावरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तरूणीने दिलेल्या फिर्यादीनुसार दि. 6 रोजी रात्री 12.30 वाजेच्या सुमारास आझादनगर भागातील आसिफ चक्की जवळ राहणारी 24 वर्षीय तरुणी घराच्या वरच्या मजल्यावर झोपलेली असतांना अचानक समीर उर्फ गुड्डू शब्बीर काझी रा.मोगलाई, धुळे हा तीच्या खोलीत शिरला. दरम्यान गुड्डूने तीच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करायच्या बेतात तीला हात लावला. त्याने हात लावताच त्या तरुणीला जाग आली. तिने गुड्डुला बघताच आरडा-ओरड करण्याचा प्रयत्न केला. मात्र गुड्डूने तीचे तोंड दाबून ठेवले. तसेच त्या तरूणीच्या तोंडावर कपडा बांधून तिच्याशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करीत तिचा विनयभंग केला. याप्रकरणी चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात आरोपी समीर काझी विरुध्द भादवी कलम 354,511, 323, 427 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.