धुळे:- जम्मू काश्मिरातील कठुआ, उत्तरप्रदेशातील उन्नाव व गुजरातमधील सुरत, महाराष्ट्रातील दोंडाईचा, कळमसरे येथे बालिकांवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ शहरातील सर्व धर्मीय नागरीकांनी एकत्र येत इन्साफ आक्रोश मूक मोर्चा काढल. सर्व समाजातील बांधव खांद्याला खांदा लावून लेकींच्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरले होते.
या विशाल मूक मोर्चात महिलाही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. शहरातील तिरंगा चौकातून शनिवारी दुपारी 2.30 वाजेच्या सुमारास मोर्चाला सुरुवात झाली. बरोबर चार वाजेच्या सुमारास मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी सर्व जाती-धर्मातील मुलींनी प्रातिनिधीक स्वरुपात जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना मागण्यांचे निवेदन दिले. त्यात बलात्कार आणि हत्येस कारणीभूत असलेल्या नराधमांना फाशीची शिक्षा व्हावी ही प्रमुख मागणी होती.