धुळ्यात नशेसाठी गुंगीकारक औषधांची बेकायदा विक्री : एजंट जाळ्यात

चाळीसगाव रोड पोलिसांची कारवाई ः 58 हजारांचा बेकायदा औषध साठा जप्त

भुसावळ/धुळे : नशा येण्यासाठी गुंगीकारक औषधांची बेकायदा विक्री करणार्‍या एजटांच्या मुसक्या चाळीसगाव रोड पोलिसांनी आवळत दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. संशयीत महिला आरोपीच्या घरातून 58 हजार 560 रुपयांचा बेकायदा गुंगी (नशा) येणार्‍या औषध साठा जप्त करण्यात आला आहे. आरीफ शहा सलीम शहा (हाजी नगर, गजानन कॉलनी, धुळे) व निलोफर उर्फ मुन्नी शाह (गजानन कॉलनी, धुळे) अशी गुन्हा दाखल असलेल्या संशयीतांची नावे आहेत तर आरीफ शहा याला अटक करण्यात आली आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
धुळे शहरातील गजानन कॉलनी भागात नशा येणार्‍या औषधांची बेकायदा विक्री केली जात असल्याची माहिती चाळीसगाव रोड पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक संदीप पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांच्या नेतृत्वात गुरुवार, 13 रोजी सकाळी 11 गजानन कॉलनीत छापा टाकून संशयीत निलोफर शाहच्या घरातून गुंगी येणारे (नशा) येणार्‍या 58 हजार 560 रुपये किंमतीच्या 482 बाटल्या जप्त करण्यात आल्या. नाईक संदीप गिरधर कढरे यांच्या फिर्यादीनुसार दोघा संशयीतांविरोधात भादंवि 328, 276 व एनडीपीएस कायदा कलम 8, 22 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक नितीन चौधरी करीत आहेत. दरम्यान, आरोपी आरीफ शहा निलोफर कडीत औषधांची विक्री एजंट म्हणून करीत असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
ही कारवाई धुळे जिल्हा पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलिस अधिकारी दिनकर पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव रोड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप पाटील, उपनिरीक्षक नितीन चौधरी, हवालदार पंकज चव्हाण, संदीप कढरे, हेमंत पवार, स्वप्नील सोनवणे, इंद्रजीत वैराट, शरद जाधव, चेतन झोलेकर, प्रशांत पाटील, सोमनाथ चौरे, मुन्नी तडवी, अमिता कोकणी, व अन्न, औषध प्रशासन विभागाचे निरीक्षक किशोर देशमुख आदींच्या पथकाने केली.