धुळे : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारलेल्या राज्यस्तरीय बंदला धुळे शहरासह जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. सकाळपासून आग्रारोडवरील व्यावसायिकांन कडून कडकडीत बंद पाळण्यात आला. इतर भागात मात्र बंदला संमिश्र प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून शाळा व एसटी बस सेवा बंद ठेवण्यात आली आहे.
मराठा क्रांती मोर्चातर्फे सकाळी आग्रारोडवरील व्यावसायिकांना बंदचे आवाहन करीत रॅली काढण्यात आली. त्यात माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, माजी आमदार प्रा. शरद पाटील, अतुल सोनवणे, कमलेश देवरे, साहेबराव देसाई, संजय वाल्हे, निलेश काटे यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
जागरण गोधळ
मराठा क्रांती मोर्चाचे तर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 21 जुलैपासून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे. आज बद दरम्यान सरकारचे निषेधार्थ आई भवानी चरणी जागरण गोधळ घालून साकडे घातले जात आहे. यात मोठ्या संख्येने मराठा महिला व पुरुष सहभागी झाले आहेत.
बससेवा ठप्प
राज्यस्तरीय बंद असल्याने आंदोलकांकडून बसची तोडफोड किंवा जाळपोळ होण्याची शक्यता लक्षात घेऊन महामंडळाच्या बसचे नुकसान टाळण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या धुळे विभागातून एक देखील बस सकाळपासून सोडण्यात आलेल्या नाही. विभागातील सर्व आगारांमध्ये बस जमा करण्यात आले आहे. सकाळपासून बस सेवा बंद असल्याने प्रवासाचे हाल होत आहे.