धुळे । कोरेगांव भिमा प्रकरणावरुन धुळ्यात निघालेल्या मोर्चाच्या दिवशी तोडफोड करणार्या, महापुरुषांचा अवमान करणार्या, अश्लिल शेरेबाजी करणार्यांविरुध्द कारवाई होईलच अशी स्पष्ट ग्वाही जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी दिली आहे. मोर्चाच्या दिवशी झालेल्या प्रकारावरुन मराठा समाज आक्रमक झाला असून पुरावे घेवून काल मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकार्यांनी जिल्हाधिकार्यांच्या दालनातच ठिय्या मांडला. प्रशासनाला तीन दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे.
सार्वजनिक मालमत्तेची नुकसान
कोरेगांव भिमा प्रकरणावरुन निघालेल्या मोर्चाच्या दिवशी शहरात कॉलनी परिसरात दहशत निर्माण करुन वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. दगडफेकही झाली होती. समाजकंटकांनी या तोडफोडीत विशिष्ट समाजाला लक्ष्य केले होते. याशिवाय निषेध म्हणून काढलेल्या मोर्चात छत्रपती शिवाजी महाराज व मराठा समाजाविषयी अनुदगार काढण्यात आले होते. यामुळे मराठा समाजामध्ये नाराजी पसरली आहे. त्यामुळे अशा समाजकंटकांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करावे. अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाने निवेदनातून केली आहे.
वाहनांची मोठे नुकसान
निषेध मोर्चात पोलिस प्रशासनानेच तडीपार केलेले काही जण पोलिसांसमोर उजळ माथ्याने फिरुन आक्रमकपणे अश्लील भाषा वापरुन दंगल माजविण्याचा प्रयत्न करत होते. असा आरोप करण्यात आला आहे. हल्ल्याचे पडसाद शहरात उमटलेले असतांना समाजकंटकांनी धुळ्यात सार्वजनीक मालमत्तेचे नुकसान केले. हे सर्व होत असतांना पोलिसांनी केवळ बघ्याची भुमिका निभावली. ज्या समाजकंटकांनी सरकारी बसेससह खाजगी वाहनांना लक्ष्य करुन तोडफोड केली त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे, त्यांची असलेली मालमत्ता विकून नुकसान भरपाई करावी.
तीन दिवसांचा दिला अल्टीमेटम
निषेध मोर्चात सहभागी असलेल्या काही समाजकंटकांनी छत्रपती शिवाजी महाराजांसह मराठा समाजाविषयी अपशब्द काढले. त्याची ध्वनी आणि चित्रफित काढून जिल्हाधिकारी पांढरपट्टे यांच्याकडे सीडी आणि पेनड्राईव्हच्या मदतीने देण्यात आले. यावेळी त्यामुळे त्याक्षणीच जिल्हाधिकार्यांनी जिल्हापोलिस प्रमुखांशी संपर्क साधुन दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. 3 दिवसांचा अल्टीमेटम मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकार्यांनी प्रशासनाला दिला आहे.