धुळ्यात मसाला विक्रेत्याकडे घरफोडी ; 17 लाखांवर डल्ला

0

चोरट्यांचे राज्य ; अन्य दोन घरफोड्यांमध्ये हजारोंचा मुद्देमाल लंपास

धुळे- शहरातील मसाला विक्रेते व कुमार नगरातील रहिवासी असलेल्या व्यावसायीकामध्ये भल्या पहाटे चोरट्यांनी गेटचे कुलूप तोडून रोकडसह तब्बल 17 लाखांच्या मुद्देमालावर डल्ला मारल्याने शहरात खळबळ उडाली आहे तर अन्य दोन घटनांमध्ये हजारोंचा ऐवज लांबवण्यात आल्याने शहरात राज्य चोरट्यांचे की पोलिसांचे ? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे घटनास्थळापासून हाकेच्या अंतरावर कुमारनगर पोलिस चौकी असतानाही चोरट्यांनी धाडस दाखवल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत आहे.

भल्या पहाटे घरफोडी
मसाला विक्रेते दिनेश रमेशलाल खेमानी हे कुमारनगरातील ब्लॉक नंबर क्यू- 5, रूम नंबर सातमध्ये कुटुंबासह दुमजली घरात राहतात. खेमानी कुटुंब वरच्या मजल्यावर तर त्यांची आई खालच्या मजल्यावर झोपल्या होत्या मात्र सोमवारी पहाटे त्यांच्या आई भागीबाई यांना परीसरात सुरू असलेल्या सत्संगाला जावयाचे असल्याने बाहेरील गेटला कुलूप लावून बाहेर पडल्या. पाळत ठेवून असलेल्या चोरट्यांनी ही संधी साधली. दरवाजाला लावलेले कुलूप टीकमच्या सहाय्याने तोडत चोरट्यांनी घरात प्रवेश करीत कपाटातील 10 लाख 50 हजारांची रोकड, एक लाख 60 हजार रुपये किंमतीच्या सोन्याच्या चार बांगड्या, 37 हजार 500 रुपये किंमतीचे दोन सोन्याचे ब्रासलेट, 62 हजार 500 रुपये किंमतीच्या पाच अंगठ्या, 25 हजार रुपये किंमतीचे दोन टोंगल असा एकूण 16 लाख 88 हजार 500 रुपयांच्या ऐवज लांबवण्यात आला.

अपर पोलिस अधीक्षकांची धाव
सत्संगला गेलेल्या भागीबाई पहाटे सहा वाजेच्या सुमारास घरी परतल्या असता त्यांना घराचे कुलूप तुटलेले तसेच साहित्य अस्ताव्यस्त दिसल्याने त्यांनी आरडा-ओरड करताच कुटुंब जागे झाले. शहर पोलिसांना माहिती कळवण्यात आली. अपर पोलिस अधीक्षक राजू भुजबळ, पोलिस उपअधीक्षक सचिन हिरे, शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक गणेश चौधरी, स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने भेट देत माहिती जाणली. ठसे तज्ज्ञांसह श्‍वान पथकालाही पाचारण्यात आले. दरम्यान, परीसरातील सीसीटीव्हीमध्ये दोन चोरट्यांची छबी कैद झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

अन्य दोन ठिकाणीही घरफोड्या
सिंचन भवनाजवळील साई एकता नगरातील रहिवासी एस.डी.शिंपी हे कामानिमित्त गावाला गेल्याने घराला कुलूप असल्याची चोरट्यांनी संधी साधली. सोमवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास चोरटे शिंपी यांच्या घरात शिरलेले असतानाच आवाज आल्याने शेजारी राहणार्‍या निखील पाठक यांना जाग आल्यानंतर त्यांनी शिंपी यांच्याशी संपर्क साधला मात्र त्यांनी पुण्यात असल्याचे सांगत घरात चोरटे असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर आरडा-ओरड करण्यात आली तसेच पोलिसांनाही माहिती देण्यात आली मात्र तो पर्यंत चोरटे मागील दाराने पसार झाले. शिंपी आल्यानंतर चोरीस गेलेल्या मुद्देमालाबाबत माहिती कळणार आहे. दरम्यान, तिसर्‍या घटनेत चितोड रोडवरील क्रांती चौकात अवघ्या 12 दिवसांपूर्वी उघडण्यात आलेल्या भवानी ट्रेडर्समधून चोरट्यांनी चार ते पाच हजारांची रोकड तसेच तेलाचे पाऊच, दुध पावडरसह अन्य किराणा सामान मिळून 40 ते 45 हजारांचा माल लांबवला. धर्मराज शंकरराव बारी यांच्या मालकिचे हे दुकान असल्याचे सांगण्यात आले.