धुळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उद्या जाहीर सभा

0

शहरातील वाहतूक मार्गात बदल ; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

धुळे- महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गुरुवार, 6 रोजी शहरातील पांझरा नदी काठावरील कालिका माता मंदिराजवळ सायंकाळी पाच वाजता जाहीर सभा होणार आहे. पोलिसांनी 5 व 6 रोजी शहरातील वाहतूक मार्गात बदल केला असून सभेच्या पार्श्‍वभूमीवर मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सभेस संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पर्यटन मंत्री जयकुमार रावल, महानगरप्रमुख अनुप अग्रवाल आदींची उपस्थिती राहणार आहे.

सभेच्या पार्श्‍वभूमीवर वाहतूक मार्गात बदल
मुख्यमंत्री तसेच आमदार अनिल गोटे यांची संतोषी माता चौक, शिवतीर्थ येथे होत असलेल्या सभेच्या पार्श्‍वभूमीवर 5 व 6 डिसेंबर रोजी दोंडाईचा, नंदूरबार, शिरपूर, शिंदखेडा तसेच जळगाव, अमळनेरकडून येणार्‍या सर्व एस.टी.बसेस तसेच लक्झरी बसेस या बायपास हायवेने चाळीसगाव चौफुलीकडून सोना कब्रस्थानमार्गे येतील तसेच लक्झरी बसेस सोना कब्रस्थानजवळ थांबतील व त्याच ठिकाणाहून प्रवासी बसवून चाळीसगाव चौफुलीमार्गे हायवेने इतरत्र ठिकाणी जातील तसेच एस.टी.बसेस या बारा पत्थर मार्गे बसस्थानकावर येतील व जातील. साक्री, सुरतकडून येणार्‍या सर्व एस.टी.बसेस सुरत बायपास रोडने चितोड चौफुलीकडून फाशीपुल मार्गे बसस्थानकात येतील तसेच सुरतकडून येणार्‍या सर्व लक्झरी बसेस सुरत बायपासने चाळीसगाव चौफुलीमार्गे सोना कब्रस्थान येथे प्रवासी उतरवतील व घेतील. 5 व 6 डिसेंबर रोजी दोन दिवस पांझरी नदी किनार्‍यावर, कालिका माता मंदिराजवळ एकही लक्झरी बस थांबवू नये, असे आवाहन शहर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक पी.व्ही.मुंडे यांनी केले आहे.