धुळे । नैसर्गिक वा मानवनिर्मित अशा कोणत्याही प्रकारच्या आपत्तीचे निवारण करण्यासाठी राज्य आपत्ती व्यवस्थापन दल धुळ्यात सज्ज झाले आहे़ त्यात 17 अधिकारी आणि 135 पोलीस कर्मचार्यांची आहे़ यंत्रणा सज्ज असली तरी त्यांना कोठे आणि केव्हा पाठवून आपत्तीचे निवारण करायचे याचे सर्वस्वी अधिकार राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला आहेत़ धुळ्यात हे दल 15 जुलै 2016 पासून सज्ज झालेले आहे़ राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दला (एनडीआरएफ) च्या धर्तीवर आता एसडीआरएफ सक्रिय झाले आहे़ धुळ्यासह नागपूर या ठिकाणी या पथकांची निर्मिती केली आहे़ एनडीआरएफ पाचवी बटालियन पुणे यांच्याकडील प्रशिक्षकांमार्फत राज्य आपत्ती प्रतिसाद दलातील पोलीस अधिकारी आणि कर्मचार्यांना सहा आठवड्यांचे विशेष प्रशिक्षण दिले. शासन निर्णयानुसार राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची प्रत्येकी एक कंपनी सीआरपीएफ गट क्र. 4 नागपूर आणि सीआरपीएफ गट क्र. 6 धुळे यांच्या आस्थापनेवर वर्ग करण्यात आलेली आहे़
प्रशिक्षणासह अत्याधुनिक यंत्रसामुग्री तयार
जिल्हास्तरावर स्वतंत्र आपत्ती निवारण कक्ष असला तरी या दलातील कर्मचारी स्वतंत्र्यरीत्या काम करण्यासाठी सज्ज झालेले आहेत़ आपत्तीचे यशस्वीपणे निवारण करण्याची मुख्य जबाबदारी त्यांच्यावर शासनाने सोपविलेली आहे़ यासाठी विशेष म्हणजे या पथकाकडे सर्व प्रकारच्या प्रशिक्षणासह अत्याधुनिक यंत्रसामुग्री आहे़ राज्य राखीव पोलीस बलाचे येथील समादेशक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली ही यंत्रणा कार्यरत आहे़ राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या धुळे येथील पथकाने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत त्यांच्यात जनजागृती करण्याची मोहीम यशस्वीपणे पार पाडली आहे़ या पथकाने नॉर्थ पॉईंट इंग्लीश स्कूल, अग्रसेन हायस्कूल, धुळे तालुक्यातील न्याहळोद येथील सानेगुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अशा विविध ठिकाणी जाऊन जनजागृती मोहीम राबविली़ आपत्ती निवारणाबाबत विद्यार्थ्यांचेही प्रबोधन केले आहे.