धुळ्यात रुग्णवाहिकेला अपघात ; डॉक्टरांसह रुग्णही जखमी

0

कराचीवाला खुंटावरील घटना ; लक्झरी रुग्णवाहिकेला धडकली

धुळे :- शिरपूर येथून पेशंट घेऊन निघालेली अ‍ॅम्ब्युलन्स धुळे शहरात पारोळा रोडवर आल्यानंतर कराचीवाला खुंटावर सकाळी मोठा अपघात झाला. गुजरातकडून आलेली लक्झरी बस अ‍ॅम्ब्युलन्सच्या मागील चाकालाधडकली. त्या अपघातात अ‍ॅम्ब्युलन्स चालकासह डॉक्टर आणि पेशंटही जखमी झाल्याची घटना शनिवारी पहाटे घडली. लक्झरीतील चार-पाच प्रवासी जखमी झाले.

आरसी पटेल मेडिकल फाऊंडेशनची अ‍ॅम्ब्युलन्स (एमएच 18 एए 801) ही पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास धुळे शहरातील कराचीवाला खुंटाजवळून हिरे मेडिकल कॉलेजकडे जात असताना त्याचवेळी अहमदाबाद येथील राजकमल ट्रॅव्हल्स बस (जीजे 03 बीटी 9015 ) ही आडवी येत असताना रुग्णवाहिकेच्या मागील भागाला जोरदार धडक दिल्याने रुग्णवाहिका पलटी झाली. या अपघातात अ‍ॅम्ब्युलन्सचा चालक शेख जमील शेख ताहेर तसेच डॉ.योगेश माळी आणि पेशंट असे तिघे जखमी झाले तर बसमधील 4 ते 5 प्रवासीही किरकोळ जखमी झाले. बस चालक पसार झाल्याने बसमधील प्रवासी दुपारपावेतो खोळंबून राहिले. अपघाताची नोंद शहर पोलिसात करण्यात आली आहे.