धुळे । वाळूची चोरटी वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर आणि पांझरा नदीच्या पात्रात साठवून ठेवलेला वाळूसाठा अप्पर तहसीलदार ज्योती देवरे, नायब तहसीलदार मिलींद वाघ यांनी दि 31 मे रोजी पकडला. दरम्यान याप्रकरणी गुन्हा नोंद करण्याचे काम सुरु होते.पांझरा नदीच्या पात्रात साठवून ठेवलेल्या वाळूच्या ठिय्यावरुन वाळूची चोरटी वाहतूक सुरु असल्याची माहिती अप्पर तहसीलदार ज्योती देवरे यांना मिळाली होती.
त्या आधारे तहसीलदार ज्योती देवरे, नायब तहसिलदार मिलींद वाघ व महसूलच्या कर्मचार्यांसह देवपूरातील एकवीरा देवी मंदिरासमोरील पुलावर पहारा दिला. याच वेळी पुलावरुन चोरटी वाळूची वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर अडवून त्यांची चौकशी केली असता त्यांच्याकडे वाळू वाहतूकीची परवानगी आढळून आली नाही. यामुळे देवरे यांनी हे दोन्ही ट्रॅक्टर देवपूर पोलीस ठाण्यात जमा केले आहेत. त्यानंतर पांझरा नदी पात्रात साठवून ठेवलेल्या एका वाळू ठिय्यावर जाऊन देवरे यांनी हा वाळू साठाही जप्त करण्याचे आदेश कर्मचार्यांना दिले.