धुळे। राष्ट्रीय महामार्ग क्र.6 च्या चौपदरीकरणासाठी जमीन देणार्या शेतकर्यांनी मोबदल्यात अन्याय झाल्याची तक्रार करत शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मारली. भूसंपादन अधिकार्याला सोबत घेवून येणार्या शेतकर्यांना जिल्हा अधिकारी भेटले नाहीत म्हणून त्यांच्या दालनाबाहेरच ठिय्या आंदोलन करीत शेतकर्यांनी न्यायासाठी धरणे धरले. अखेरीस निवासी उपजिल्हाधिकारी यांनी चर्चेची तयारी दाखविल्याने हे ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले.
जुन्या आणि नव्या दरात तफावत
राष्ट्रीय महामार्ग क्र.6 च्या चौपदरीकरणासाठी धुळे ते साक्री दरम्यानच्या गावातील शेतकर्यांचे जमीनी संपादित करण्यात आल्या.काही ठिकाणी आवश्यकते पेक्षा जास्त जमीन घेण्यात आली तर मोबदला देतांना जुन्या आणि नव्या दरात तफावत असल्याने शेतकर्यांना कमी मोबदला मिळाल्याची तक्रार करीत या शेतकर्यांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे.यापूर्वी आपापल्या जागेत ठिय्या आंदोलन करुन चौपदरी करणाचे काम बंद पाडणार्या या शेतकर्यांनी शेतकरी आत्महत्या दिनाचे औचित्य साधून महात्मा गांधी पुतळ्याजवळ मुक आंदोलनही केले होते. त्यानंतर जिल्हाधिकार्यांनी शेतकर्यांच्या मागण्या महिनाभरात पूर्ण करण्याचे आश्वासन 24 मार्चला दिले होते. मात्र, त्या आश्वासनाची पूर्तता न झाल्याने 25 एप्रिल रोजी पुन्हा शेतकर्यांनी जिल्हाधिकार्यांची भेट घेवून आठवण करुन देण्यात आली.