भुसावळ/धुळे : धुळे तालुका पोलिसांनी राज्यात प्रतिबंधीत असलेल्या गुटख्याची तस्करी रोखत मालेगाव, ता.नाशिक येथील दोघा संशयीतांच्या मुसक्या आवळत चार लाख 24 हजार 270 रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. या प्रकरणी धुळे तालुका पोलिसात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून एकूण नऊ लाख चार हजार 270 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विंगर वाहनावरील चालक अबू सुफीयान करीम अहमद (27, रा.प्लॉट नं.4, गुलशन अश्रम नगर, रमजानपुरा, मालेगाव) व गुटख्याची वाहतूक करणारा मालक मौलाना मुजाहिद अंजुम (45, रा.अस्लमपुरा, मालेगाव) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
गोपनीय माहितीवरून कारवाई
धुळे तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना धुळे तालुका हद्दीतील कुसुंबा-मालेगाव रोडदरम्यान गुटख्याची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर नाकाबंदी लावण्यात आली. गुरुवार, 6 रोजी पहाटेच्या सुमारास टाटा विंगर गाडी (क्रमांक एम.एच.43 एक्स.9925) आल्यानंतर तिची तपासणी केली असता त्यात मोठ्या प्रमाणावर विमल पानमसाला गुटखा आढळून आला. पोलिस कर्मचारी सागर काळे, प्रवीण पाटील, महेश्वर गोसावी, अविनाश गहिवड, संतोष देवरे, धीरज सांगळे, भूषण पाटील, कुणाल शिंगाणे, विशाल गुरव आदींनी सापळा रचत वाहनाचा शोध घेतला. ताब्यात घेतलेल्या वाहनामध्ये एकूण 89 लहाण प्लॅस्टीक गोण्यांमध्ये महाराष्ट्र राज्यात वाहतूक, साठा व विक्रीस प्रतिबंधीत असलेला विमल पानमसाला व व्ही-1 तंबाखूचा एकूण चार लाख 24 हजार 270 रुपयांचा साठा आढळल्याने तो जप्त करण्यात आला तर वाहन मिळून नऊ लाख चार हजार 270 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे जिल्हा पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव, साक्री उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप मैराळे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक हेमंत पाटील यांच्यासह पथकातील एएसआय सागर काळे, हवालदार प्रवीण पाटील, हवालदार महेश्वर गोसावी, नाईक अविनाश गहिवड, नाईक संतोष देवरे, कॉन्स्टेबल धीरज सांगळे, कॉन्स्टेबल भूषण पाटील, कॉन्स्टेबल कुणाल शिंगाणे, कॉन्स्टेबल विशाल गुरव आदींच्या पथकाने केली.