धुळे । येथे 2 व 3 डिसेंबर रोजी ग्रंथोत्सव 2017 चे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहे. या महोत्सवात सहभागी सर्व विभागांनी परिपूर्ण नियोजन करावे, असे निर्देश प्रभारी जिल्हाधिकारी गंगाथरण डी. यांनी मंगळवारी दिले. ग्रंथोत्स्व 2017 च्या पूर्व तयारीसाठी प्रभारी जिल्हाधिकारी गंगाथरण डी. यांच्या दालनात जिल्हा समन्वय समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी संजय म्हस्के, जिल्हा माहिती अधिकारी रणजितसिंह राजपूत, प्रकाश पाटील, आर. ओ. पाटील, अजय महाजन आदी उपस्थित होते. आयएमए सभागृह व धों. शा. गरुड वाचनालयाच्या आवारात ग्रंथ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
एकाच ठिकाणी सुविधा
ग्रामीण व शहरी भागातील लोकांमधील वाचन संस्कृतीमध्ये वाढ व्हावी, ग्रंथप्रेमींना एकाच ठिकाणी विविध ग्रंथ साहित्य व वाड्मय विषयक पुस्तके उपलब्ध व्हावीत, प्रकाशक आणि ग्रंथ विक्रेता यांना ग्रंथ विक्रीसाठी एकाच ठिकाणी आवश्यक ती सुविधा उपलब्ध व्हावी हा ग्रंथ महोत्सवाच्या आयोजनामागील हेतू असल्याचे प्रभारी जिल्हाधिकारी गंगाथरण डी. यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांचा सहभाग
ग्रंथोत्सवानिमित्त ग्रंथदिंडी काढण्यात येईल. या ग्रंथदिंडीत शहरातील विद्यार्थी सहभाग नोंदवतील. याशिवाय प्रकट मुलाखत, कथाकथन, कवी संमेलन, परिसंवाद आदी कार्यक्रम होतील. ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून नागरिकांना ग्रंथ, कथा, कादंबर्या, बाल साहित्यासह विविध विषयांवरील पुस्तकांच्या खरेदीची संधी उपलब्ध होणार आहे. ग्रंथोत्सवानिमित्त धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक जिल्ह्यातील विविध शासकीय व खासगी ग्रंथ व पुस्तक विक्रेते, प्रकाशक आपापले स्टॉल मांडणार आहेत.
विविध समित्या गठीत
या महोत्सवात सहभागी होणार्या विभागांनी परिपूर्ण नियोजन करावे. दोन दिवस होणार्या विविध कार्यक्रमांचे सूक्ष्म नियोजन करावे. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी कवी, लेखक, साहित्यिक यांना निमंत्रित करावे, असेही जिल्हाधिकारी गंगाथरण डी. यांनी सांगितले. या महोत्सवासाठी विविध समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. समित्यांनी नियोजन करुन आराखडा सादर करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या.