धूमस्टाईलने महिलेची सोनसाखळी लांबविली

0

जळगाव। दादावाडी येथील महिला आकाशवाणी चौकाजवळील स्वाध्याय भवनात बैठकीसाठी सकाळी आल्या होत्या. बैठक आटोपल्यानंतर त्या भवनाच्या बाहेर पडताच दुचाकीवरुन आलेल्या दोन जणांनी त्यांच्या गळ्यातील 60 हजार रुपये किमतीची दोन तोळ्याची सोनसाखळी लांबविल्याची घटना रविवारी सकाळी साडे आठ वाजता गणपती नगरात घडली. सोनसाखळी लांबविण्याची एप्रिल महिन्यातील ही चौथी घटना आहे.

स्वाध्याय भवनातून बाहेर पडताच घडली घटना
ललिता प्रवीणकुमार चोपडा (वय 52, रा.दादावाडी) या दररोज आकाशवाणी चौकाजवळ असलेल्या गणपती नगरातील स्वाध्याय भवनात बैठकीसाठी येतात. त्याप्रमाणे रविवारीही त्या या स्वाध्याय भवनात आल्या. बैठक आटोपून बाहेर पडताच परिसरात दबा धरुन बसलेल्या दोन जणांनी दुचाकीवरुन येवून त्यांच्या गळ्यातील दोन तोळ्याची सोनसाखळी लंपास केली. हा प्रकार लक्षात येताच ललिता चोपडा यांनी आरडाओरड केली, मात्र सकाळची वेळ असल्याने गल्लीत कोणीच नव्हते. सोबत असलेल्या अन्य महिलांनी परिसरात त्यांचा शोध घेतला. परंतू सोनसाखळी चोरटे मिळून आले नाही. सोनसाखळी लांबविल्यानंतर ललिता यांनी रामानंद नगर पोलीस स्टेशन गाठून घटनेची माहिती दिली.

पोलिसांची घटनास्थळी धाव
कॉन्स्टेबल अतुल पाटील व विजय खैरे यांनी गणपती नगरात जावून घटनासथळाची पाहणी केली. डॉ.दीपक अटक यांच्या ममता हॉस्पीटलच्या शेजारुनच हे चोरटे आले होते. त्यामुळे पोलीस तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यासाठी गेले होते, मात्र संगणक ऑपरेटर नसल्याने फुटेज मिळू शकले नाहीत. या फुटेजमध्ये चोरटे कैद झाले असावेत अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. दरम्यान, स्वाध्याय भवनात सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, परंतु ते आतमध्ये आहेत. बाहेर एकही कॅमेरा नाही, त्यामुळे या कॅमेर्‍यांचा उपयोग झाला नाही.