तीन दुचाकींसह 93 हजारांचा मुद्देमाल जप्त
धुळे– धुम स्टाईल चोर्या करीत पोलिसांची डोकेदुखी वाढवणार्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात देवपूर पोलिसांना यश आले आहे. आरोपींच्या ताब्यातीून तीन दुचाकींसह तीन मोबाईल आणि एक सोन्याची मंगलपोत मिळून 93 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. शहरातील नगावबारी परिसरातील एक व वाडीभोकर गावातील तीन तरुणांना देवपूर पोलिसांनी अटक केली असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपींच्या ताब्यातून दुचाकी (एम.एच.39 टी 7844), (एम.एच.18 क्यू 7572) आणि (एम.एच.39 टी.7844) जप्त करण्यात आल्या. तीनही दुचाकी चोरीच्या आहेत.
या आरोपींना अटक
शांतीलाल सुदाम महिरे, राजू तुकाराम जहांगीर, सुरज बबन ठाकरे व सुभाष जगदीश ढिवरे या आरोपींना अटक करण्यात आली आहे. अटकेतील आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत असून पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यासह साक्री पोलीस आरोपींना त्यांच्याकडील गुन्ह्यातील चौकशीकामी ताब्यात घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
यांनी केली कारवाई
जिल्हा पोलीस अधीक्षक एम.रामकुमार, अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे, उपअधीक्षक सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली देवपूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक अकबर ए.पटेल, सहायक पोलीस उपनिरीक्षक एन.एम. शेमडे, सी.एस.चातुरे, हवालदार पंकज चव्हाण, कैलास पाटील, चंद्रशेखर नागरे, कबीर शेख, संदीप अहिरे, प्रवीण थोरात, विनोद आखडमल, नरेंद्र शिंदे यांनी ही कारवाई केली.