जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी ; अनेक गुन्ह्यांचा उलगडा होणार
भुसावळ:- धूम स्टाईल येत मोबाईल लांबवणार्या तिघा आरोपींच्या मुसक्या जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने बर्हाणपूरातुन आवळल्या आहेत. भुसावळ शहरातील अभिजीत शरद जाधव व त्यांचा मित्र फरीद हे दोघे दुचाकीने जात असतांना मागून येणार्या दुचाकीवरील भामट्यांनी जाधव यांचा 22 हजार रुपयांचा मोबाईल लांबवला होता. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर चोरट्यांचा शोध सुरू होता
बर्हाणपूरजवळून आरोपींच्या आवळल्या मुसक्या
तालुका पोलिसांसह जळगाव स्थानिक गुन्हे शाखेकडून या गुन्ह्याचा तपास सुरू असताना संशयीत मध्यप्रदेशात असल्याची माहिती मिळाल्यानंतर सापळा रचून त्यांना अटक करण्यात आली. या प्रकरणी लवेश रामलाल परदेशी (वय 19), राहुल नामदेव कोळी (वय 19, दोघे रा.मरीमाता मंदिराच्या मागे, सातारा, भुसावळ) व राज अरविंद भालेराव (सोनार, वय 21, रा.गणेश कॉलनी, भुसावळ) यांना अटक करण्यात आली. जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ तालुका पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सचिन खामगड, सुपडा पाटील, युनूस शेख, विजय पाटील, रवींद्र पाटील, शरीफ काझी, नरेंद्र वारुळे, विकास वाघ आदींच्या पथकाने तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दुचाकी (एम.एच. 19 बी.डी. 1052) ताब्यात घेण्यात आली आहे.
शहर व बाजारपेठ पोलीस घेणार आरोपीचा ताबा
अटकेतील राज भालेराव व राहुल कोळी यांची न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे तर संशयीत लवेश परदेशीने शहर व बाजारपेठ पोलीस ठाणे हद्दीत गुन्हे केल्याची माहिती असून त्यास लवकरच अटक करण्यात येणार असल्याचे समजते.