येरवडा । विश्रांतवाडी-लोहगाव मार्गावरील कस्तुरबा सोसायटीलगत महावितरण विभागाच्या वतीने बसविण्यात आलेल्या विद्युत डीपीला आवरणच नसल्याने तेथे कधीही मोठा अपघात होण्याची संभावना आहे. यामुळे महावितरण अधिकार्यांचा मनमानी कारभार चव्हाट्यावर आला असून उघड्या असणार्या डीपीस तात्काळ झाकण बसविण्यात यावे अन्यथा बहुजन समाज पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पक्षाच्या सचिव मेनका जितेंद्र कराळेकर यांनी दिला आहे.
विश्रांतवाडी परिसरातून श्री क्षेत्र आळंदी, आंतराष्ट्रीय लोहगाव विमानतळ, येरवडा आदी भागाकडे मार्ग जात असल्यामुळे या मार्गावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते. या मार्गालगतच विद्युत डीपी बसविण्यात आला आहे. मात्र त्या डीपीस लोखंडी झाकणाचे आवरण नाही. त्यामुळे एखाद्या दिवशी परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण डीपीलगतच पालिकेच्या वतीने लाखो रुपये खर्च करून शौचालय बांधण्यात आले असून शौचालयाची स्वच्छता राहावी याकरिता सोडण्यात येणारे सांडपाणी देखील डीपीलगतच वाहत आहे. त्यातच यालगतच उघड्यावर नाला वाहत आहे. याबरोबरच येथून हाकेच्या अंतरावरच खासगी शाळा असल्यामुळे लहान विद्यार्थी ह्याच रस्त्याचा वापर करत असतात.
यासंदर्भात महावितरण अधिकार्याकडे वारंवार तक्रार करून देखील अधिकार्यांनी नागरिकांच्या मुख्य समस्येला केराची टोपली दाखविल्यामुळे असलेले अधिकारी खरोखरच सर्वसामान्य जनतेचे असलेले प्रश्न सोडविण्यास सक्षम आहेत का? असा संतप्त सवाल कराळेकर यांनी केला आहे. कारण यापूर्वी देखील याच मार्गावर धोकादायक असणार्या विद्युत पोल विषयी कराळेकर यांनी आवाज उठविला होता तर त्यांना अनेक अडचणींना सामोरे जाण्याची वेळ आली होती. अनेक व्यावसायिक परिसरात वाहन लावत असल्यामुळे चारचाकी वाहने मागे घेताना देखील दुर्घटनेची शक्यता नाकारता येत नाही. संबंधित महावितरण विभागाचे अधिकारी एखाद्या दुर्घटनेची वाट पाहत आहे का? असा प्रश्न कराळेकर यांनी उपस्थित करून नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोणातून विद्युत डीपीस झाकण तात्काळ बसविण्यात यावे. अन्यथा पक्षाच्या वतीने विश्रांतवाडी येथील महावितरण उपकेंद्रासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा कराळेकर यांनी दिला आहे.