धोकादायक वीजवाहिनीचा प्रश्‍न मार्गी

0

वाघोली । वाघोलीत आनंदनगर येथून महावितरणच्या उच्चदाब वीज वाहिनी गेल्या आहेत. त्यामुळे गेल्या 25 वर्षांपासून 150 नागरिकांना धोकादायक स्थितीत वावरावे लागत होते. परंतु आता या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. म्हणतात ना गाव करेल ते राव काय करेल, अशीच प्रचीती वाघोलीत आनंदनगर परिसरातील नागरिकांना आली आहे. येथील कैलास शिंदे यांच्या राहत्या घरापासून ते संभाजीनगर लाइन क्र. 5 येथील संग्राम जाधवराव यांच्या घरापर्यंत महावितरणच्या उच्चदाब वीज वाहिनी गेली होती. याबाबतीत उपसरपंच समीर भाडळे यांनी पुढाकार घेऊन स्थानिक नागरिक व महावितरण अधिकारी यांच्या परवानगीने या ठिकाणच्या वीजवाहक वाहिनीसाठी स्थानिक नागरिकाने जागा उपलब्ध करून दिल्यामुळे हा धोकादायक प्रश्‍न मार्गी लागला आहे.

महावितरणच्या उच्चदाब वीज वाहिनीमुळे सुरक्षितपणे ये-जा करणे कठीण होत होते. यासाठी समीर भाडळे व पूजा भाडळे यांनी स्वतःची जागा दिल्यामुळे महावितरणची मोठी अडचण दूर झाली आहे, नागरिकही ये-जा करू लागले आहेत. माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे, माजी सरपंच शिवदास उबाळे, माजी पंचायत समिती सभापती वसुंधरा उबाळे, महेंद्र भाडळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. याबद्दल सोपान गायकवाड, साहेबराव ढमढेरे, अनिल जाधवराव, बाळासाहेब सातव, अतुल बनकर, आनंद शेटिया, गुलाब पवार, शिवाजी तुपे, शिवाजी रामगुडे, तुकाराम आधाटे, पप्पू लबडे, भारत सातव, सचिन नवले, प्रमिला सातव आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

सांडपाण्याचा प्रश्‍न सोडवण्यासाठीही प्रयत्न
संदीप जाधव यांच्या घरापासून ते कावेरी हॉटेलपर्यंतच्या भागातील सांडपाण्याचा प्रश्‍न सोडवण्यासाठीही उबाळे व भाडळे कुटुंबीयांनी मदत केली आहे. तर बायफ रस्त्याच्या सभोवती पेव्हिंग ब्लॉक बसवणे, भाडळे वस्ती रस्त्यासाठी 17 लाख रुपयांचा निधी खर्चून काम करणे, डोमखेलमधील नागरिकांसाठी सार्वजनिक नळांची व्यवस्था करणे, अनुसया पार्क येथील बंदिस्त गटार लाइनसाठी प्रयत्न, सुयोग लकी होम, आनंदनगर, वाघेश्‍वर इंग्रजी माध्यमाची शाळा आदी भागात मोठे पथदिवे बसवण्यात आले आहेत. तसेच नगर रोड ते पानमळासाठी भरीव निधीची तरतूद करून रस्ता करण्यात येणार असल्याचे उपसरपंच भाडळे यांनी सांगितले.