धोनीला वगळण्याचा निर्णय योग्यच – अजित आगरकर

0

नवी दिल्ली : बीसीसीआयने आगामी विंडीज आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली. विंडीज व ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यासाठी टी-20 संघामध्ये बीसीसीआयने महेंद्रसिंह धोनीला वगळून ऋषभ पंतला संधी देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयावर सोशल मीडियावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली. मात्र भारताचा माजी गोलंदाज अजित आगरकर याने, धोनीला टी-20 संघातून वगळण्याचा निर्णय योग्यच असल्याचं म्हटलं आहे.

एका संकेतस्थळाशी बोलत असताना आगरकर याने आपलं मत मांडलं आहे. 2020 साली ऑस्ट्रेलियात होणारा टी-20 विश्वचषक पाहता धोनीला वगळण्याचा निर्णय योग्य असल्याचं आगरकरने म्हटलं आहे. एखाद्या खेळाडूची संघात निवड होत असताना तो किती महान खेळाडू आहे याऐवजी भविष्यकाळाचा विचार करणं अधिक गरजेचं आहे. “निवड समितीने धोनीचं करिअर संपलेलं नाही असा संदेश दिला आहे, यामधून त्यांना नेमकं काय सुचवायचं आहे, मला माहिती नाही. मात्र 2020 साली ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 विश्वचषकात धोनी खेळेल की नाही याची शाश्वती नसताना त्याला सध्या आता संघात स्थान देण्यात काहीच अर्थ उरत नाही. टी-20 क्रिकेटमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये त्याची कामगिरी चांगली होत नाहीये.” असं ही आगरकरनी म्हंटल आहे.