मुंबई । आगामी आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धा 2019 मध्ये इंग्लंडमध्ये होणार असून त्यासाठी सर्वच संघांनी आतापासून कंबर कसली आहे. द. आफ्रिकेविरुद्धची एकदिवसीय क्रिकेट मालिका आणि श्रीलंकेतील टी-20 तिरंगी मालिकेत भारताने चमकदार कामगिरी केली आहे. याच मालिकेत दिनेश कार्तिकनेही शानदार कामगिरी केली. त्यामुळे आता धोनीऐवजी कार्तिकला खेळवण्यात यावे, अशी मागणी केली जाऊ लागली आहे. दिनेश कार्तिकच्या तुफानी खेळीनंतर आता काही जण अशीही मागणी करत आहेत की, एकदिवसीय संघात धोनीच्या जागी कार्तिकला संधी देण्यात यावी.
पण भारतीय संघाचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवाग याच्या मते, विश्वचषक स्पर्धेमध्ये धोनीची उपस्थिती ही युवकांना मार्गदर्शक ठरेल. जेव्हा युवा खेळाडू धोनीच्या मार्गदर्शनाखाली खेळतील तेव्हाच 2019चा विश्वचषक भारत जिंकू शकेल. धोनीचे नेतृत्त्व आणि रणनीती यामुळेच भारताने 2011 साली विश्वचषकावर नाव कोरले होते, असे सेहवाग एका कार्यक्रमात म्हणाला. एका कार्यक्रमादरम्यान बोलताना सेहवाग म्हणाला की, एक युवा खेळाडू म्हणून मी माझा पहिला विश्वचषक दौरा सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि अनिल कुंबळे यांच्यासोबत 2003 साली खेळलो होतो. त्यावेळी हे सर्व सीनियर खेळाडू माझी मदत करत होते. सध्या भारतीय संघात अनेक युवा खेळाडू आहेत. पण त्यांच्याकडे धोनीसारखा वरिष्ठ खेळाडू आहे. धोनी त्यांना योग्य मार्गदर्शन करू शकतो.