समाजाला आरक्षण मिळण्यासाठी राज्य बैठकीत जनआंदोलनाचा निर्धार
भुसावळ- धोबी समाजाच्या प्रदेशाध्यक्षपदी बारा बलुतेदार महासंघाचे जिल्हा सचिव तथा जळगावच्या सामाजिक चळवळीतील खंदे कार्यकर्ते विवेक ठाकरे यांची एकमताने निवड करण्यात आली. समाजाची राज्य कार्यकारणीची गुरुवारी बैठक अखिल भारतीय धोबी महासमाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष बालाजीराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई मराठी पत्रकार संघात झाली. या बैठकीत ही निवड करण्यात आली. या बैठकीत राज्यातील धोबी समाजाच्या आरक्षणासहीत विविध प्रलंबित मागण्यांबाबत भाजपा सरकार उदासीन असल्याने आगामी काळात राज्यभरात धोबी समाज जनआंदोलन उभारेल असा निर्धार करण्यात आला. बैठकीत राज्य शासनाच्या भुमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करून शासनाने धोबी समाजासह तत्सम छोट्या-छोट्या जाती समुहावर एकप्रकारे अन्यायच चालविल्यामुळे शासनाचा निषेध करून यापुढे राज्यभर जनआंदोलन उभारण्याचे एकमताने ठरले.
राष्ट्रसंत गाडगेबाबांचा शासनाकडून अवमान
स्वच्छतेचे पुजारी राष्ट्रसंत गाडगेबाबा यांचा शासनाने एकप्रकारे अवमान चालविला असल्याचे संतापजनक मत मुख्य संघटक संजय भिलकर यांनी मांडले. गाडगेबाबांच्या नावाचे सुरू करण्यात आलेले स्वच्छता अभियान शासनाने बंद केल्याचा शासन निर्णय काढला नसला तरी स्वच्छता अभियान राबवले जात नसल्याने शासनाने गाडगेबाबांच्या स्वच्छतेच्या महान कार्याला तिलांजली देण्याचे पाप केल्याची भावना त्यांनी मांडली.
पूर्ववत आरक्षणासाठी केंद्राला शिफारस पाठवण्यात टाळाटाळ
राज्यातील धोबी समाजाला भारतातील 17 राज्ये व 5 केंद्रशासीत प्रदेशात असलेल्या अनुसूचित जात प्रवर्गाचे आरक्षण पुर्ववत लागू होण्यासाठी 2002 पासून शासनाकडे प्रलंबित असलेल्यसा डॉ.भांडे समितीच्या शिफारशीचा अहवाल केंद्राकडे पाठविण्याचा स्वत: फडणवीस यांचा शब्द होता मात्र सत्तेत आल्यानंतर साडेचार वर्षात मुख्यमंत्र्यांनी धोबी समाजाला नुसते वारंवार आश्वासन करून शिफारस पाठविण्यास टाळाटाळ होत असल्याने राज्यभरातील समाजमनात तीव्र संतापाची लाट निर्माण झाल्याने सरकारने धोबी, न्हावी, कुंभार, सुतार, साळी, कोष्टी अशा छोट्या समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास परीणाम भोगावे लागतील, असा इशारा नुतन प्रदेशाध्यक्ष विवेक ठाकरे यांनी दिला.
ऋणमोचन तीर्थस्थळाला कवडीचा निधी नाही
भाजपा सरकार धनगर समाजाला एक हजार कोटी देतेमात्र राष्ट्रसंत गाडगेबाबांची कर्मभूमी असलेल्या ऋणमोचन (जि.अमरावती) तीर्थक्षेत्राला कवडीचाही विकास निधी देत नाही. समाजाने वारंवार मागणी करून व विकास आराखडा शासनाकडे प्रलंबित असतांना गाडगेबाबांच्या ऋणमोचनकडे दुर्लक्ष का? असा खडा सवाल राष्ट्रीय अध्यक्ष बालाजीराव शिंदे यांनी व्यक्त करून धोबी समाजाचे आरक्षण, ऋणमोचन तीर्थक्षेत्र विकास व गाडगेबाबांच्या नावाचे ग्रामस्वच्छता अभियान पुर्नजिवित करून गाडगेबाबांना भारतरत्न सन्मान जाहीर करण्याची कार्यवाही मुख्यमंत्र्यांनी तातडीने करावी अन्यथा राज्यातील सर्व छोट्या जात समुहांचा तीव्र लढा उभारला जाईहल, असा ईशारा आपल्या अध्यक्षीय भाषणातशिंदे यांनी दिला.
राज्य कार्यकारणी बैठकीला यांची उपस्थिती
माजी प्रदेशाध्यक्ष विजय देसाई, नागपूर शहराध्यक्ष मनिष वानखेडे, दत्तात्रय बननें, गोपी चाकर, उल्हास मोकळकर, युवा प्रदेशाध्यक्ष संजय वाल्हे, भास्कर चिंचुलकर, विलास गायकवाड, सुनील खैरनार, आनंदराव शिंदे, सरदार पोवार, संभाजी सायकर, अॅड.योगेश खैरनार, दत्ता वाघ, संजय टोपे, राजेंद्र देसाई या प्रमुख पदाधिकार्यांची उपस्थिती होती.