‘धोमबलकवडी’च्या कालव्यामुळे चाळीसगाव, वीसगाव खोर्‍यातील शेतजमीन येणार ओलिताखाली

0

भोर । वाई तालुक्यातील धोमबलकवडी धरणाच्या कालव्याच्या पाण्यावर टिटेघर-कोर्ले-वडतुंबी या उपसा सिंचन योजनेच्या कामाला सुरुवात झाली आहे. चाळीसगाव आणि वीसगाव खोर्‍यातील शेतकर्‍यांच्या शेतजमिनी या पाण्यामुळे बहरणार असल्याचे भोर विधानसभा मतदार संघाचे आमदार संग्राम थोपटे यांनी सांगितले. भोर तालुक्यातून धोमबलकवडी धरणाचे पाणी कालव्याद्वारे जात असताना या पाण्याचा लाभ तालुक्यातील चाळीसगाव आणि वीसगाव खोर्‍यातील शेतकर्‍यांना व्हावा, येथील शेतकरी बागायतदार व्हावा, हे राज्याचे माजीमंत्री आणि काँग्रेसचे लोकनेते अनंतराव थोपटे यांनी पाहिले होते, त्यांचे हे स्वप्न साकार होणार आहे.

वेनवडी उपसा सिंचन योजनेलाही मंजुरी
धोमबलकवडी प्रकल्प 1995-96 मध्ये झाला. या योजनेतील मौजे टिटेघर-कोर्ले-वडतुंबी या उपसा सिंचन योजनेला मंजुरी मिळाली आहे. याबरोबरच वेनवडी उपसा सिंचन योजनेलाही मंजुरी असून या दोन उपसा सिंचन योजनांच्या पाण्यावर तालुक्यातील 1 हजार 50 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. टिटेघर, वडतुंबी आणि कोर्ले या तीन गावांचे 302 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.

6.29 इंचाची पाईपलाईन
या योजनेतील मौजे टिटेघर येथे 700 मिटर व वडतुंबी येथे 1 हजार मीटर लांबीच्या चारी खोदाईचे काम नुकतेच सुरू करण्यात आले असून यासाठी 160 एम. एम. म्हणजेच 16 से. मी. (6.29 इंच)ची पाइपलाईन यांत्रिकी विभागाच्या सल्ल्यानुसार वापरली जाणार आहे. यासाठी 75 अश्‍वशक्तीचा एक व 55 अश्‍वशक्तीचा एक असे दोन पंप वापरात आणले जाणार आहेत, असे आमदार थोपटे यांनी सांगितले. या प्रकल्पातील उजवा कालवा व डावा कालव्याचा समावेश असून यामुळे तालुक्यातील सुमारे 1,050 हेक्टर क्षेत्र ओलीताखाली येणार आहे. माजी मंत्री अनंतराव थोपटे यांनी दुरदृष्टीने रचलेल्या या पायावर कळस चढवण्याचे काम आमदार संग्राम थोपटे करीत असून या त्यांच्या कामाबद्धल शेतकर्‍यांत समाधानाचे आणि आनंदाचे वातारण आहे.

1 हजार कोटींची तरतूद
महसुली क्षेत्रांपैकी 75 टक्के क्षेत्राला या पाण्याचा लाभ होणार आहे, असे आमदार संग्राम थोपटे यांनी सांगितले. धोमबलकवडीच्या पाण्यावरील या उपसा प्रकल्पांसाठी 1 हजार 402 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. तर यातील टिटेघर-कोर्ले-वडतुंबी या उपसा योजनेसाठी 3 कोटी 69 लाख रुपयांची शासनाने सुधारीत मान्यता प्राप्त झाली असल्याचे आमदार संग्राम थोपटे यांनी सांगितले.