नवी दिल्ली । हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस (29 ऑगस्ट) देशात राष्ट्रीय क्रीडा दिन देशात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. आंतरराष्ट्रीय पातळविर देशाला नावलौकीक मिळवून देणार्या विविध खेळांमधील क्रीडापटूंना या दिवशी देशातील महत्वाच्या अशा क्रीडा पुरस्कारांनी सन्मानीत करण्यात येते. भारतीय संघाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने हॉकीचे जादूगार ध्यानचंद यांच्या आठवणीला उजाळा देण्यासाठी अनेक ट्विट केली आहेत. ध्यानचंद यांचे खेळातील योगदान आणि त्यांचे राष्ट्रप्रेम प्रेरणादायी आहे. त्यामुळे देशातील प्रत्येक मुलाला ध्यानचंद माहिती असायलाच हवेत, असे सेहवागने म्हटले आहे. सेहवागने ध्यानचंद यांच्या आठवणीला उजाळा देताना हिटलर आणि बर्लिन ऑलिम्पिकच्या आठवणींचे किस्से ट्विट केले आहेत. तसेच एका ट्विटमध्ये त्याने महान क्रिकेटर डॉन ब्रॅडमन यांनी ध्यानचंद यांचे कौतुकाचा किस्सा देखील शेअर केलाय. ध्यानचंद यांचा खेळाने प्रभावित होऊन महान क्रिकेटर डॉन ब्रॅडमन यांनी त्यांची तुलना क्रिकेट फलंदाजाशी केली होती.
क्रिकेटमध्ये फलंदाज ज्याप्रमाणे प्रत्येक चेंडूवर धावा करण्याचा प्रयत्न करतो. अगदी तसे गोल तू हॉकीच्या मैदानात करतोस, असे ब्रॅडमन यांनी म्हटले होते. सेहवागच्या ट्विटवर अनेक प्रतिक्रिया उमटत असून, काही ट्विट त्याने रिट्विट देखील केले आहे. 1928, 32 व 36 या पाठोपाठच्या ऑलिम्पिकमध्ये हॉकीतील सुवर्ण पदकांची हॅट्रिक भारताने साजरी केली. त्यात मेजर ध्यानचंद यांचा सिंहाचा वाटा होता. या तीन ऑलिम्पिकमध्ये भारताच्या 101 गोलांपैकी 38 गोल चक्क ध्यानचंद यांनी केले आहेत.