नंदुरबारमध्ये एसटी कर्मचारी विलगीकरणाच्या मागणीवर ठाम

नंदुरबार। राज्य परिवहन महामंडळाचे शासनात वर्गीकरण करावे, अशा मागणीसाठी एसटीचे कर्मचारी बेमुदत संपावर आहेत. त्यामुळे महिन्याभरापासून ‘लालपरी’ थांबली असल्याने शनिवारी, 4 डिसेंबर रोजी नंदुरबार आगारातून धुळ्यासाठी एक विनावाहक बस धावली. यामुळे संपकर्‍यांमध्ये फूट पडल्याची चर्चा आहे. नंदुरबार आगारातून केवळ चार प्रवासींच्या आधारावर बस काढण्यात आली. हे केवळ संपात फूट पडल्याचा चुकीचा प्रयत्न होत आहे. एसटी कर्मचारी विलगीकरणाच्या मागणीवर ठाम असतील, अशी प्रतिक्रिया संपकरी कर्मचार्‍यांनी व्यक्त केली.

राज्यभर एसटी कर्मचार्‍यांनी मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारला आहे. काही ठिकाणी या संपात फूट पडली आहे. नंदुरबार जिल्ह्यात सर्व आगारातील एसटी कर्मचारी संपावर ठाम होते. त्यामुळे महिन्याभरापासून जिल्ह्यातील कोणत्याही आगारातून एकही बस धावली नाही. परंतु, शनिवारी नंदुरबार आगारातील बसस्थानकातून धुळ्यासाठी विनावाहक असलेली एक बस दुपारी साडेबारा वाजेदरम्यान धावली. या बसमध्ये चार प्रवासी होते. ही बस चालक किरण पवार हे घेऊन गेले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्तात बस रवाना करण्यात आली. याप्रसंगी आगार प्रमुख मनोज पवार, शहर पोलीस निरीक्षक किरण खेडकर यांच्यासह पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

जनतेच्या सेवेसाठी कामावर परतलो
नंदुरबार बस स्थानकातील धुळ्यासाठी रवाना झालेली बस किरण पवार या चालकाने चालविली. गेल्या महिन्याभरापासून एसटी बंद असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असल्याने ही बाब लक्षात घेऊन बस चालविण्यासाठी रुजू झालो आहे. जनतेची सेवा करावी, या उद्देशाने कामावर परत आल्याचे त्यांनी सांगितले.