नंदुरबार । येथील पंचायत समितीच्या सर्वसाधारण सभेत आजी माजी सभापतींमध्ये चांगलीच जुंपल्याचे चित्र पाहायला मिळाले. पंचायत समितीची सर्वसाधारण सभा बुधवारी स्व. हेमलताताई वळवी सभागृहात घेण्यात आली होती. सभेच्या अजेंड्यावरील विषय क्र. 6 वरील बांधकाम विभागाने प्रस्तावित केल्याप्रमाणे सेस अंतर्गत कामांना मंजुरी देण्याच्या विषय समोर आल्यानंतर विरोधी सदस्यांनी त्यास आक्षेप घेतला. याविषयावरून अर्धा तास गदारोळ चालला. गदारोळात सभापती रंजना नाईक व माजी सभापती तथा विद्यमान सदस्या अर्चना गावित यांचात शाब्दिक चकमकी झडल्या. पंचायत समितीची मासिक सर्वसाधारण सभा बुधवार 8 नोव्हेंबर रोजी सभापती रंजना नाईक यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. व्यासपीठावर उपसभापती ज्योती पाटील, गटविकास अधिकारी उदय कुसुरकर, सहाय्यक गटविकास अधिकारी महेश पोतदार, ग्रामपंचायत विभागाचे अनिल बिर्हाडे आदी उपस्थित होते.