नंदुरबारातील लाचखोर मीटर टेस्टर एसीबीच्या जाळ्यात

0

दंडाची रक्कम कमी करण्यासाठी स्विकारली पाच हजारांची लाच

नंदुरबार :- भरारी पथकाने नवापूर येथे टाकलेल्या धाडीनंतर एका वीज ग्राहकाचे वीज मीटर जप्त केले होते. संबंधित ग्राहकास 28 फेब्रुवारी रोजी नंदुरबारातील वीज कंपनीच्या कार्यालयात उपस्थित राहण्यासाठी कळवण्यात आले होते. यावेळी वीज ग्राहकाला वीज कंपनीचे मीटर टेस्टर मंगेश वसंत पालवे यांनी तुमच्या मीटरमध्ये तुम्ही बिघाड केल्याने तुम्हाला 70 हजार दंड भरावा लागेल, असे सांगून मला पाच ते सहा हजार रुपये दिल्यास दंडाची रक्कम कमी होणार नाही, असे सांगत दम भरला होता. यानंतर पालवे हे मुंबईला निघून गेल्यानंतर 21 रोजी पालवे नंदुरबारात परतल्याने त्यांनी पंचांसमक्ष पाच हजारांची लाच स्विकारल्याने नंदुरबार एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहाथ अटक केली.

यांनी केली कारवाई
ही कारवाई नंदुरबार एसीबीचे उपअधीक्षक एस.टी.जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक करूणाशील तायडे, निरीक्षक संगीता पाटील, हवालदार उत्तम महाजन, हवालदार संजय गुमाने, दीपक चित्ते, मनोज अहिरे, अमोल मराठे, ज्योती पाटील, संदीप नावाडेकर, सचिन परदेशी, मनोहर बोरसे आदींच्या पथकाने केली.

वीज मीटर तपासण्याचा खाजगी एजन्सीला कंत्राट
वीज वितरण कंपनीने असि.क्वॉलिटी कंट्रोल श्री समर्थ इन्फोटेक या कंपनीला वीज मीटर तपासणीचा कंत्राट दिला होता. या कंपनीत लाचखोर मंगेश पालवे हा मीटर टेस्टर म्हणून कार्यरत असल्याचे सुत्रांनी सांगितले. दरम्यान, सुत्रांच्या माहितीनुसार आरोपी हा कल्याण येथील रहिवासी असून त्याच्या घराची झडती घेण्यासाठी ठाण्यातील पथक निघाल्याचे सुत्रांनी सांगितले.